NEP 2020 Breaking News : संलग्न महाविद्यालयात अंमलबजावणी पुढील वर्षापासून

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे यांनी उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून संलग्न महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षापासून एनईपीची अंमलबजावणी करावी याबाबत आग्रह धरला.

NEP 2020 Breaking News :  संलग्न महाविद्यालयात अंमलबजावणी पुढील वर्षापासून
NEP Implementation

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (new education policy) प्रथम वर्षाचे प्रवेश केवळ राज्यातील स्वायत्त महाविद्यालयांमध्ये (autonomous college) व विद्यापीठातील विविध विभागांमध्ये (University Department) द्यावेत. एनईपी (NEP) अंतर्गत विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील (affiliated colleges) प्रथम वर्षाचे प्रवेश पुढील (first year admission) वर्षापासून करावे,अशा स्वरूपाचा अध्यादेश लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यभरातील विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थी, प्राध्यापक ,प्राचार्य यांना 'एनईपी' समजून घेण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे.

हेही वाचा : शिक्षण प्राध्यापक संघटनेचा एनईपी अंमलबजावणीला नकार ; विद्यापीठांसमोर मांडणार भूमिका
       राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीने दिलेल्या अहवालानुसार एनईपी अंमलबजावणी करण्याचा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आला. विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या सर्व महाविद्यालयांमधील प्रवेश एनईपी नुसार करावेत, असे परिपत्रक नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रसिद्ध केले. तसेच अभ्यासक्रमाचा प्रारुप आराखडा संकेतस्थळावर जाहीर केला. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्राध्यापक संघटनेने सुद्धा या संदर्भात नाराजी व्यक्त करत एनईपीची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करावी, अशी भूमिका घेतली. 

एज्युवार्ता फॉलोअप: शिक्षण NEP 2020 : विद्या परिषदेच्या नियुक्त्या रद्द झाल्याने अंमलबजावणीत अडचणी; सुकाणू समिती अध्यक्षांची नाराजी
इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला असून महाविद्यालयांना प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश द्यावे लागणार आहेत. तत्पूर्वी विद्यापीठाचा अभ्यासक्रम तयार होणे गरजेचे आहे. मात्र, विद्यापीठात अभ्यास मंडळ सदस्य नियुक्तीवरून निर्माण झालेल्या गोंधळामुळे अभ्यासक्रम तयार होण्यास विलंब होणार आहे.ही बाब विचारात घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे सदस्य राजेश पांडे यांनी उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून संलग्न महाविद्यालयांमध्ये पुढील वर्षापासून एनईपीची अंमलबजावणी करावी याबाबत आग्रह धरला. त्यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे पांडे यांनी सांगितले.                          

" राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील शासनाच्या अध्यादेशानुसार पुणे विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून  संलग्न महाविद्यालयांनी एनईपी अंतर्गत प्रथम वर्षाचे प्रवेश करावेत, अशा सूचना दिल्या. मात्र, सध्या विद्यापीठाने अभ्यासक्रम तयार केले नाहीत, अशा परिस्थितीत एनईपीची अंमलबजावणी केल्यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. ही बाब विचारात घेऊन मी राज्याच्या उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावर्षी केवळ स्वायत्त महाविद्यालये आणि विद्यापीठातील विभागांमध्येच नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत कार्यवाही करावी, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये एनईपीची अंमलबजावणी पुढील वर्षी करावी, याबाबत सविस्तर चर्चा केली. त्यावर अधिका-यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुधारित अध्यादेश लवकरच प्रसिद्ध केला जाईल, असे आश्वासन दिले." 
- राजेश पांडे, सदस्य, सल्लागार मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ