NEP 2020 : महाराष्ट्रचा मसुदा उत्कृष्ट असणार; ॲम्बी व्हॅलीमध्ये झाले मंथन

 ‘स्टार्स’ व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विचार विनिमयासाठी दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली.

NEP 2020 : महाराष्ट्रचा मसुदा उत्कृष्ट असणार; ॲम्बी व्हॅलीमध्ये झाले मंथन
Education Department Workshop

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

लोणावळा येथील द ॲम्बी व्हॅली सिटी (Aamby Vally City) येथे शालेय शिक्षण विभागाच्यावतीने (Education Department) ‘स्टार्स’ व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या (NEP 2020) प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विचार विनिमयासाठी दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा तयार करावा, अशा सुचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी यावेळी दिल्या. (Education Department brainstorms in Amby Valley on new education policy)

शालेय शिक्षण विभागाच्या या कार्यशाळेत राज्यभरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा : बालभारतीने वाढवले पालकांचे बजेट; या पाठ्यपुस्तकांच्या किंमती २०० रुपयांच्या पार

मंत्री केसरकर म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती, वस्तुनिष्ठ इतिहास स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. कोविड कालावधीत झालेले विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व घटकांनी सांघिकपणे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३ हे वर्ष ‘गुणवत्ता वृद्धी वर्ष: म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाने निपुण भारत अभियान व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचित केले आहे.

कार्यशाळेत विविध विषयांवर विचारमंथन

कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक डॉ. नेहा बेलसरे यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उहापोह केला. परिषदेच्या उपसंचालक डॉ. कमलादेवी आवटे  यांनी पायाभूत शिक्षणाचा आराखडा या विषयावर संवाद साधला. राज्य अभ्यासक्रम आराखडा या विषयावर विभाग प्रमुख राजेंद्र वाकडे यांनी मार्गदर्शन केले. ‘क्वेस्ट’ या सामाजिक संस्थेचे निलेश निमकर यांच्या  प्रारंभिक साक्षरतेचे अध्यापन या विषयावरील सादरीकरण करण्यात आले.

हेही वाचा : MPSC Exam : आजच्या परीक्षेने केले दोन विक्रम; आयोगाच्या इतिहासात पहिल्यांदाच...

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी ‘राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण’ अहवाल, ‘परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स’ नुसार महाराष्ट्राचे यश, स्टार्स, समग्र शिक्षाअंतर्गत विविध उपक्रमांची अंमलबजावणी, पीएम श्री शाळा, व्यावसायिक शिक्षण आदी विषयांवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे विविध उपक्रम, वाचन लेखन या बरोबरच समजपूर्वक वाचन, आकलन, साहित्याचा रसास्वाद यास असलेले महत्त्व या विषयावर दिवेगावकर यांनी  संवाद साधला.

शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड व संध्या गायकवाड यांनी सांगली व पुणे  जिल्ह्यातील विविध शैक्षणिक उपक्रमांचे सादरीकरण केले. कृषी विभागाचे संचालक रावसाहेब भागडे यांनी शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश या विषयावर सादरीकरण केले. नवसाक्षरता अभियानाचे स्वरुप व क्षेत्रीय यंत्रणेची जवाबदारी या विषयावर योजना संचालनालयाचे संचालक डॉ. पालकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी बदलती पाठ्यपुस्तके या विषयावर संवाद साधला. त्यानंतर प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरातील शिक्षणाचा सुधारित आकृतीबंध या विषयावर मुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. रणजित सिंह देओल यांच्या समारोपपर मार्गदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळेचे सूत्रसंचालन परिषदेतील संशोधन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. दत्ता थिटे यांनी केले. प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी उपस्थितांचे आभार मानले.