शैक्षणिक आराखड्यात असे आहे पूर्व प्राथमिक अन् पहिली-दुसरीचे वेळापत्रक...

राज्य आराखड्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळांसाठी नमुना वेळापत्रक देण्यात आले असून स्थानिक संदर्भानुसार त्यामध्ये आवश्यक बदल करून वेळेचे नियोजन करू शकतात, असे स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक आराखड्यात असे आहे पूर्व प्राथमिक अन् पहिली-दुसरीचे वेळापत्रक...
State Curriculum Framework

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य शैक्षणिक आराखड्यामध्ये (State Curriculum Framework 2023) पूर्व प्राथमिक व इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गांच्या दैनंदिन व्यवस्थापनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यानुसार पूर्व प्राथमिकचे वर्ग २१० मिनिटे म्हणजे साडे तीन तास तर पहिली व दुसरीचे वर्ग ३०० मिनिटे म्हणजेच पाच तास सुरू असतील, असे वेळापत्रक देण्यात आले आहे. पहिली व दुसरीच्या वेळापत्रकामध्ये जवळपास दीड तास प्रथम भाषा किंवा मातृभाषेसाठी देण्यात आला आहे.

 

राज्य आराखड्यामध्ये पूर्व प्राथमिक शाळांसाठी नमुना वेळापत्रक देण्यात आले असून स्थानिक संदर्भानुसार त्यामध्ये आवश्यक बदल करून वेळेचे नियोजन करू शकतात, असे स्पष्ट केले आहे. वेळापत्रकामध्ये एक संरचित दिनक्रम दिलेला असला तरी त्यात स्थानिक संदर्भ व बालकांच्या गरजांनुसार लवचिकता असावी. एकाद्या बालकाला वेळापत्रकानुसार दिलेली कृती करण्याची अजिबातच इच्छा नसल्यास त्याला हवे असणारे काम शांतपणे करण्याची मुभा द्यावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखडा : खाजगी पूर्वप्राथमिक शाळांच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह

एकूण २१० मिनिटांमध्ये प्रामुख्याने मुक्त खेळ, बोधात्मक विकास, गाणी, भाषा विकास, शारीरिक विकास, परिसर परिचय, सर्जनशील कृती, गोष्टी यावर अधिक भर देणे अपेक्षित आहे. त्यानुसार वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. वय ३ ते ६ वयोगट एकत्र असताना सर्व भाषांचा वापर संमिश्र पध्दतीने केला जाऊ शकतो. तर वय वर्षे ६ ते ८ म्हणजे इयत्ता पहिली व दुसरीसाठी भाषेसाठी स्वतंत्र वेळ असणे आवश्यक आहे. साक्षरता संख्याज्ञान आणि कला या विषयांसाठी स्वतंत्र तासिकांचे नियोजनही केले जाऊ शकते, असे आराखड्यात म्हटले आहे.

 

प्रथम भाषा किंवा मातृभाषेसाठी दररोज ९० मिनिटे असावीत. द्वितीय भाषेसाठी ६० मिनिटे एवढा वेळ नियोजित असावा. गणित व संख्याज्ञान यासाठी दररोज ६० मिनिटे असावीत. अधिक वेळ हा कला, क्रीडा आणि बागकाम यांसारख्या कृतींसाठी देता येईल. स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार वेळापत्रकात लवचिकता राहील, असेही आराखड्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

 

पूर्वप्राथमिक नमुना वेळापत्रक

अ. क्र. कृती कालावधी (मिनिटे)
१. मुक्त खेळ ३०
२. परिपाठ - प्रार्थना, चेतना व्यायाम, आरोग्य तपासणी, दिनदर्शिका, हवामान तक्ता, हजेरी, ओळखपत्र, बातमी सांगणे. १०
३. छोटी सुट्टी १०
४. बोधात्मक विकास ३०
५. गाणी १५
६. भाषा आणि साक्षरता विभाग ३०
७. मोठी सुट्टी ३०
८. शारीरिक विकास (वर्गातील व वर्गाबाहेरील खेळ) २०
९. सौंदर्यदृष्टीचा विकास व सर्जनशील कृती/ परिसर परिचय/ विज्ञानानुभव (एक दिवसाआड) २०
१०. गोष्ट १०
११. आज आपण काय केले/ रोजचे सिंहावलोकन 
१२. एकूण वेळ २१० (३ तास ३० मि.)

इयत्ता पहिली व दुसरी नमुना वेळापत्रक

अ. क्र. दैनंदिन दिनचर्या (मिनिटे) उपक्रम/ कृती/ विषय
१. ३०  परिपाठ
२. ३० भाषिक संवाद (L1)
३. ३० शब्द ओळख/ शब्द प्रत्याभिज्ञान (L1)
४. १५ लघु मध्यंतर
५. ६० गणित
६. ३० कला/ हस्तकला
७. ६० दीर्घ मध्यंतर
८. ३० वाचन/ लेखन (L1)
९. ६० मौखिक संवाद/ गप्पा, शब्दओळख (L2)
१०. १५ लघु मध्यंतर
११. ३० शारीरिक शिक्षण व आरोग्य/ कार्यशिक्षण

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k