कमवा व शिका योजनेत सुधारणा करणार ; वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन 

योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाच्या स्वरूपात कोणत्या सुधारणा करता येतील यासंदर्भात ही समिती काम करणार आहे.

कमवा व शिका योजनेत सुधारणा करणार ; वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने (Savitribai Phule Pune University) कमवा व शिका योजनेच्या (Earn and Learn Scheme ) मानधनात वाढ करण्याबरोबरच या योजनेची व्याप्ती निश्चित करण्यासाठी समिती स्थापन (committee establishment) केली आहे.विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील (affiliated colleges) अधिकाधिक गरीब व गरजू विद्यार्थ्यांना या योजनेत सामावून कसे घेता येईल.योजनेंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाच्या स्वरूपात कोणत्या सुधारणा करता येतील यासंदर्भात ही समिती काम करणार आहे.दरम्यान,  मानधन वाढीचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व सी-नेट सदस्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा : विजयादशमीला विद्यार्थी एकजूटीचा 'विजय'; अखेर कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ

विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात ४५ रुपायांवरून ५५ रुपये वाढ करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला. तसेच या योजनेची व्याप्ती व स्वरूप ठरवण्यासाठी डॉ.देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापना करण्यात आली. या समितीत डॉ.बागेश्री मंठाळकर , डॉ.डी.बी. पवार, राहुल पाखरे यांचा समावेश आहे.कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांना मोठ्या दिलासा दिला आहे.मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थी हिताचे निर्णय लवकर घेतले तर त्यांचा फायदा होईल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ. देविदास वायदंडे म्हणाले , विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत माझ्या अध्यक्षतेखाली कमवा व शिका योजनेत आवश्यक बदल करण्यासाठी समिती स्थापना केली आहे.या योजनेचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.तसेच अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  
 ---------

'' सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करावी, याबाबत सातत्याने विद्यापीठाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला.त्यास अखेर यश आले आहे. विद्यार्थी हिताचा विचार करून मानधनात ६० रूपये वाढ होणे अपेक्षित होते. पण विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने प्रतितास ५५ रुपये वाढ केली. मानधन वाढीबाबत आडमुठी भूमिका घेणाऱ्या विद्यापीठ प्रशासनाला अखेर दोन पावले मागे यावे लागले. यातून विद्यार्थी संघटित झाले तर काय होऊ शकते, हेच दिसून येत.आता विद्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेच्या माध्यमातून गवत काढणे,  साफसफाई करणे आदी कामे न देता कौशल्य विषयक कामे द्यावित.''  

- संतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
---------------------

'' कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याची मागणी उशीरा का होईना मान्य झाली याचे समाधान आहे.मात्र, विद्यापीठाकडून घेतलेल्या निर्णयाची लवकर अंमलबजावणी होत नाही.त्यामुळे आंदोलन विद्यापीठ प्रशासनाला करण्याचा इशारा द्यावा लागला होता.आता मानधन वाढीची रक्कम तात्काळ देण्याबाबत कार्यवाही करावी.''  
-  दादाभाऊ शिनलकर, आधिसभा सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
--------------------

"कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने विद्यापीठात चालवल्या जाणाऱ्या कमवा व शिका योजनेचा खऱ्या अर्थाने आता विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.वाढत्या महागाईचा विचार करता मानधनात वाढ करण्याची आवश्यकता होती. अभाविपचे तत्कालीन पदाधिकारी व आमदार राम सातपुते यांनी मानधन वाढीसाठी उपोषण केले होते.आता मागेल त्याला काम या मागणीसाठी अभाविपकडून विद्यापीठाकडे पाठपुरावा केला जाईल." 

- अनिल ठोंबरे, अभाविप,पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री  

--------------------------------------------------


'' विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ झाली पाहिजे यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा व संघर्ष करत होतो. आज विद्यापीठ प्रशासनाने ४५ रूपये प्रतितास वरून ५५ रूपये अशी वाढ केलेली आहे. आम्ही या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयामुळे विद्यापीठ व विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांच्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.''  

राहुल ससाणे - विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती