समाज कल्याण विभागात प्रथमच कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

समाज कल्याण विभागात प्रथमच कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन

 पुणे :  राज्यात समाज कल्याण विभागांतर्गत ९० मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळा आहेत तसेच २ सफाई कामगारांच्या मुला- मुलींच्या शासकीय शाळा सुरू आहेत. या शाळामधील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विभागांतर्गत नवनविन शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहे. त्याअंतर्गतच समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच क्रीडानैपुण्य विकसीत होण्यासाठी कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन विभागाच्या वत्तीने प्रथमच करण्यात आले आहे. 
 सदर कला व क्रीडा महोत्सव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी भूमिका-अभिनय व लोकनृत्य स्पर्धांचे तसेच  १०० मी. धावणे, २०० मी. धावणे, ४०० मी. धावणे, रीले-४x१००मी., लांब उडी, थाळीफेक, रस्सीखेच व खो-खो या क्रीडास्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. त्या त्या जिल्ह्यातील सर्व निवासी शाळा यामध्ये सहभागी झाले असुन त्याचे नियोजन संबधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त यांच्यावतीने करण्यात आले आहे. पुणे विभागातील पुणे ,सातारा, सांगली, सोलापुर ,कोल्हापुर जिल्हातील निवड झालेल्या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर स्पर्धा होणार आहे. विभागीय स्तरावर प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.
 पुणे विभागीय स्तरावरील सदर स्पर्धा ह्या शासकिय निवासी शाळा दिवे ता पुरंदर जिल्हा पुणे येथे दि ३१ जानेवारी  २०२३ रोजी होणार आहेत. त्यासाठी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण पुणे यांच्या मार्गद्र्शनाखाली विविध समित्या यासाठी गठीत करण्यात आल्या आहेत. समाज कल्याण विभागात प्रथमच कला व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. 

------------------------------
  “समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतुन विभागात प्रथमच कला व क्रीडा अविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे, यामुळे खाजगी शाळा प्रमाणेच समाज कल्याण विभागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून या उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांकडून स्वागत होत आहे यामुळे चांगले खेळाडु तयार होणार आहेत.” - बाळासाहेब सोळंकी, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, पुणे.