"कोशात जगणाऱ्या सेट,नेट, पीएचडी पात्रताधारकांनो." स्वप्नरंजनातून जागे व्हा !

उच्चशिक्षितांपैकी अनेक पात्रता धारकांना वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी धावून येईल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल.आपण कातडी बचाव भूमिका घेणार असू तर आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे होणारे हाल हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघावे लागतील.

"कोशात जगणाऱ्या सेट,नेट, पीएचडी पात्रताधारकांनो." स्वप्नरंजनातून जागे व्हा !

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षणासारख्या मूलभूत विषयाचे खाजगीकरण किंवा कंत्राटीकरण केलं तर उद्याच्या भारताचे भविष्य काय असेल हा मोठा चिंतनाचा विषय आपल्यापुढे आज आ वासून उभा आहे. जगभरातल्या अनेक विकसित देशांमध्ये शिक्षणावरती १५ टक्क्याहून अधिक खर्च केला जातो.आपल्याकडे त्याची तरतूद सहा टक्क्यांपर्यंत केलेली असली तरी प्रत्यक्षात मात्र त्यापेक्षा कमीच रक्कम खर्च होताना दिसतो.केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक धोरणाचा बिगुल वाजवला असलं तरी राज्यस्तरावर ते प्रत्यक्ष कार्यरत होणं आव्हानात्मक आणि ज्यांनी ते राबवायला हवं त्यांच्या इच्छाशक्तीच्या मर्यादांना ललकारणारं आहे.

हेही वाचा : दिव्यांग प्राध्यापक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी निवड समितीत दिव्यांग प्रतिनिधी बंधनकारक

मागच्या सरकारमधले शिक्षण मंत्री हे घोषणा मंत्री होते.शिक्षण क्षेत्रामध्ये आपण फार मोठी क्रांती करत आहोत, अशा स्वसमजीतून त्यांनी  दिवसागणित अनेक घोषणा केल्या आणि  जीआर देखील  काढले.  पण पुढे त्या सर्व जीआर चे काय झाले, हे आपण सगळे जाणतोच. याच मंत्री महोदयांनी आणि त्यांच्या पक्षाने सत्तेत येण्यापूर्वी मोठा गाजावाजा केला होता की आम्ही सत्तेत आल्यावर वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व रिक्त जागा भरू मात्र  प्रत्यक्षात सत्तेत आल्यावर त्यांच्या या गोष्टीला मुहूर्त मिळाला नाही. कशाबशा त्यातल्या निम्म्या अधिक जागा दीर्घ प्रतीक्षेनंतर भरल्या  गेल्या.  मात्र  बाकीच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. हे आपण जाणतो. त्याच काळात विरोधी पक्षात जे होते, त्यांनी सुशिक्षित बेकारांच्या बाजू उचलून धरताना सर्व पात्रताधारकांच्या बाजूने लढा दिला; नव्हे तर तसं भासवलं. आज त्यातलेच काही लोक सत्तेत सामील झाले आहेत.  मात्र त्यांच्या भूमिका बदललेल्या दिसून येत आहेत .प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय स्तरावर येऊ घातलेल्या खाजगीकरणाविरुद्ध अनेकांनी समाज माध्यमांपुढे  आपली मते मांडली. चर्चा झाली.काही काळ फुफाटा उडाला आणि वादळ निर्माण होण्यापूर्वीच नेहमीप्रमाणे क्षमलं. 
शिक्षणाच्या खाजगीकरणाची ही नांदी केवळ याच टप्प्यावर थांबेल असं पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये निश्चितच नाही, यानंतर वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये देखील अशाच प्रकारचा कार्यक्रम राबवला जाऊ शकतो, अशा प्रकारचं वातावरण एकूणच सरकारच्या भूमिकांमधून आज आपल्याला दिसतय. एकूणच ,सरकारी निमसरकारी शाळा- महाविद्यालयांमध्ये शिजू पाहणारी ही खिचडी काही ठराविक सरकार दार्जीन्या कंत्राटदारांच्या पुढ्यात अलगद उतरणार आहे असं दिसतंय. असं जरी होत असलं तरी दुसरीकडे मात्र या सगळ्या व्यवस्थेला बळी ठरणारा उच्चशिक्षित पात्रता धारक वर्ग मात्र मूग गिळून गप्प बसण्याच्या भूमिकेमध्ये आपणाला आज दिसतो आहे. आज उच्चशिक्षितांपैकी अनेक पात्रता धारकांना वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी धावून येईल आणि आपल्याला न्याय मिळवून देईल.आपल्यापैकी अनेकांची अवस्था जांभळाच्या झाडाखाली झोपलेल्या आशाळ भुतासारखी झालेली आहे. आपल्यातील प्रत्येकाला आशा आहे की कोणीतरी येईल, आपल्यासाठी हे झाड हलवतील ,जांभूळ अलगद आपल्या तोंडात पडेल आणि आपल्याला त्याचा आस्वाद घेता येईल.

ही बातमी वाचली का ? :उत्तरपत्रिकेत कामसूत्रच्या कथा आणि प्राध्यापकांना शिव्या ; विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

आज आपल्यातील प्रत्येकाला,इतर पात्रता धारकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे, आंदोलन केली पाहिजेत, प्रसंगी सरकारवर टीका करून अटक करून घेतली पाहिजे, आपले प्रश्न सुटले पाहिजेत,  अशा आशा लागल्या आहेत किंवा हे  सगळं करण्यासाठी कुणीतरी मसिहा यायला हवा.  त्याने आपले प्रश्न सोडवले पाहिजेत म्हणजे आपण आल्हादपणे व्यवस्थेमध्ये घुसू आणी नोकऱ्यांमधला आनंद लुटू , अशा धारनेमध्ये काही लोक जगत आहेत.

 मित्रांनो, "तुम लढो हम तुम्हारे कपडे संभालते है "ही जी वृत्ती आज आपल्या सगळ्या उच्च शिक्षकांमध्ये बळावते आहे. आज आपल्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला असताना देखील आपण कातडी बचाव भूमिका घेणार असू तर आपल्यासारखे लाचार आपणच असू.आज आपल्या प्रत्येकाला आपली,  आहे त्या ठिकाणची नोकरी वाचवायची आहे. प्रस्थापित यंत्रणे विरुद्ध जायची कुणालाच इच्छा नाही. आपण जर उघडपणाने बोललो तर आपली आहे त्या ठिकाणची नोकरी जाईल, आपला संसार उघड्यावर पडेल या भीतीने आपल्यातील पात्रता धारक आज कुणीतरी मसिहा आपल्यासाठी  येऊन आपल्याला न्याय देईल, या स्वप्नरंजनामध्ये जगत आहे.
शिकार व्हायला हवी पण त्यासाठी खांदा माझा नको,  किंवा साप मारायला हवा पण त्यासाठी काठी माझ्या हाती नको,  ही मानसिकता मनी धरणारे प्रश्न सुटण्यासाठी  स्वतःच्या  खांद्याचा उपयोग करणार नाहीत. एकूणच, ही ह्या वर्गाची आगतिकता आहे असं काही म्हणतील देखील.  पण जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते तेव्हा पाण्यात बुडणारी माकडीन देखील स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या बाळाच्या मानेवर उभी राहते आणि स्वतःला वाचवते. हा निसर्गाचा नियम आम्ही कधी आत्मसात करणार आहोत की नाही ?
आज आपल्या सर्व पात्रता धारकांच्या गळ्याशी,आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत; तरीही आम्ही सुखासीन आहोत,आत्मसंतुष्ट आहोत, नव्हे तर तसे दाखवण्याचा बेगडी प्रयत्न करत आहोत. आता वेळ आली आहे चिंतनाची. खऱ्या अर्थाने कृती करण्याची. आपल्या उद्धाराला कोणीही मसीहा येणार नाही.आपला उद्धार आपल्यालाच करावा लागेल.त्यासाठी आधी आपल्याला  रस्त्यावर उतरावे लागेल आणि आज जर आपण कातडी बचाव भूमिका घेणार असू तर आपले आणि आपल्या पुढच्या पिढीचे होणारे हाल हे आपल्याला उघड्या डोळ्यांनी बघावे लागतील. तेव्हा हे पात्रता धारकांनो, जागे व्हा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वावरील विविध पदव्यांची झूल बाजूला काढा आणि आपल्या अस्तित्वाचा लढा आपल्या स्वतःच्याच हातात घ्या.एकत्र या.निकराचा लढा देऊन  व्यवस्थेविरुद्ध स्वतःला सिद्ध करा,  नाहीतर स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी गुंडाळून व्यवस्थेचे बळी व्हायला तयार व्हा.आता तुमच्याकडचा 'चॉईस' संपलेला आहे.

लेखक 
 - प्रा.भास्कर घोडके 
MA,MPhil,SET,PGDSEB,DTD,DJC .
 (पीएच.डी संशोधक पुणे)