विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार, पण जुन्या पुस्तकांचे काय? बालभारतीच्या संचालकांनी दिली माहिती

गतवर्षीपर्यंत छापलेल्या जुन्या पुस्तकांचा मोठा साठा उपलब्ध आहे. तसेच बालभारतीच्या पुस्तकांची रचना बदललेली असली तरी अभ्यासक्रमात मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नाही.

विद्यार्थ्यांना नवीन पुस्तके मिळणार, पण जुन्या पुस्तकांचे काय? बालभारतीच्या संचालकांनी दिली माहिती
Balbharati Books Update

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

येत्या शैक्षणिक वर्षापासून बालभारतीच्या (Balbharati) पहिली ते आठवीच्या पुस्तकांची रचना बदलण्यात आली आहे. शाळा (Schools) सुरू होताच ही नवीन पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडतील. परंतु असे असले तरी विद्यार्थी बालभारतीची जुनी पुस्तकेही (Balbharati Books) अभ्यासासाठी वापरू शकतात. जुनी पुस्तके बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील (Krishnakumar Patil) यांनी दिली.

नवीन पुस्तके आल्यामुळे जुन्या पुस्तकांचे काय?, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात होता. कारण गतवर्षीपर्यंत छापलेल्या जुन्या पुस्तकांचा मोठा साठा उपलब्ध आहे. तसेच बालभारतीच्या पुस्तकांची रचना बदललेली असली तरी अभ्यासक्रमात मात्र कोणताच बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना जुन्या पुस्तकांची आवश्यकता भासेल, ते विद्यार्थी जुने पुस्तक खरेदी करू शकतात, असे बालभारतीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षक पदभरती लांबणार; आधार पडताळणीसाठी नवी डेडलाईन

बालभारतीच्या बदललेल्या रचनेनुसार सर्व विषयांच्या पुस्तकांचे केवळ चार पुस्तकांत रूपांतर केले आहे. त्या चार पुस्तकांवर भाग १, भाग २, भाग ३, भाग ४ असे लिहिण्यात आले आहे. प्रत्येक भागात प्रत्येक विषयांचे साधारण ५ धडे समाविष्ट केले आहेत. त्यामुळे शाळेत जाताना विद्यार्थ्यांना केवळ एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक पाठानंतर विद्यार्थ्यांना महत्वाच्या नोंदी करण्यासाठी वहीचे कोरे पान देण्यात आले आहे.

शिक्षकांच्या वारंवार बदल्यांची प्रथा थांबणार; स्थानिक भागातच नोकरीला प्राधान्य

दरम्यान, पुस्तकातच नोंदी करण्यासाठी कोरे पान दिल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वह्या आणाव्या लागणार की नाही?, असाही प्रश्न अनेक पालक व विद्यार्थ्यांना पडला आहे. या विषयी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना वर्गपाठासाठी प्रत्येक विषयासाठी एक वही करावी लागणार आहे. तसेच गृहपाठासाठी देखील प्रत्येक विषयाला वही करावी लागणार आहे. त्यामुळे वही बंद होणार, असा संभ्रम कोणीही करून घेऊ नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo