SPPU News : उपहारगृह व भोजनगृहातील गुणवत्ता नियंत्रणासाठी नवीन समिती, चार विद्यार्थ्यांचा समावेश

विद्यापीठाच्या आवारामध्ये एकूण १३ उपहारगृह व भोजनगृह आहेत. विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांकडूनही याठिकाणी खानपान केले जाते. पण काही भोजनगृहातील अन्नाबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी केल्या जातात.

SPPU News : उपहारगृह व भोजनगृहातील गुणवत्ता नियंत्रणासाठी नवीन समिती, चार विद्यार्थ्यांचा समावेश
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही महिन्यांपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPU) उपहारगृह व भोजनगृहातील (Canteen) खाद्यपदार्थ्यांच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जेवणामध्ये झुरळ, अळ्या सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यानंतर दोन भोजनगृहांचे कंत्राटही रद्द करण्यात आले. आता विद्यापीठ प्रशासनाने नवीन दक्षता समिती स्थापन केली आहे.

 

 

विद्यापीठाच्या आवारामध्ये एकूण १३ उपहारगृह व भोजनगृह आहेत. विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांकडूनही याठिकाणी खानपान केले जाते. पण काही भोजनगृहातील अन्नाबाबत विद्यार्थ्यांकडून तक्रारी केल्या जातात. त्याविरोधात आंदोलनेही झाली आहे. काही दिवसांपुर्वीच कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार (Dr. Prafulla Pawar) आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यानंतर विद्यापीठाने नवीन दक्षता समिती स्थापन केली आहे.

वाङ्‍मय चौर्य प्रकरणी पीएच.डी. रद्द; विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कारवाई

 

भोजनगृहांचे दैनंदिन व्यवस्थापन, नियमन आदी कामांची जबाबदारी या दक्षता समितीवर असेल. डॉ. राजेंद्र घोडे हे समितीचे अध्यक्ष असतील. तर डॉ. गीता शिंदे, डॉ. दीपा प्रसाद व्यंकटरमण, डॉ. हरिश्चंद्र नवले, डॉ. अभिजीत कुलकर्णी व डॉ. परविन सय्यद हे सदस्य आणि ज्ञानेश्वर साळुंके हे सदस्य सचिव असतील. दक्षती समितीच्या नियंत्रणाखाली विद्यार्थ्यांचा समावेश असलेली भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समिती कार्यरत असेल.

 

गुणवत्ता नियंत्रण समितीमध्ये चार विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे विद्यार्थी सदस्य दक्षता समितीच्या सुचनेनुसार आळीपाळीने फक्त भोजनगृह गुणवत्ता नियंत्रणांसबंधी काम करतील, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या समितीमध्ये सागर अलकुंटे (हिंद विभाग), तुकाराम जाधव (मराठी विभाग), तुकाराम शिंदे (इतिहास विभाग) आणि राहुल ससाणे (मराठी विभाग) यांचा समावेश करण्यात आला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k