वाङ्‍मय चौर्य प्रकरणी पीएच.डी. रद्द; विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कारवाई

किशोर निवृत्ती धाबे यांची पीएच.डी पदवी रद्द करण्यात आली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत दहा वर्षांपूर्वी राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली होती.

वाङ्‍मय चौर्य प्रकरणी पीएच.डी. रद्द; विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच कारवाई

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने (BAMU) ६५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यादांच संशोधन प्रबंधात वाङ्‍मय चौर्य (Plagiarism) केल्याप्रकरणी एकाची पीएच.डी. (Ph.D.) पदवी रद्द केली आहे. विद्यापीठ प्रशासनाने या कारवाईबाबत राज्यपाल व कुलपती रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांच्याकडे शिफारस केली होती. राज्यपालांना त्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे वाङ्‍मय चौर्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.

 

किशोर निवृत्ती धाबे यांची पीएच.डी पदवी रद्द करण्यात आली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत दहा वर्षांपूर्वी राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली होती. ‘किनवट तालुक्यातील आदिवासी नेतृत्व आणि आदिवासीसाठीच्या कल्याणकारी ध्येय धोरणांची अंमलबजावणी’ हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्याविरोधात पुरूषोत्तम रामटेके यांनी पुराव्यांसह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार केली होती. इतर  शोधप्रबंधातील मजकूर चोरण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले होते.

रॅप सॉंग, रिक्त पदे, परीक्षा विभागातील कारभाराने अधिसभा गाजणार

  

तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलगुरूंनी डॉ. धर्मराज वीर, डॉ. शुजा शाकेर व डॉ. मृदुल निळे या तीन सदस्यांची चौकशी समिती नेमली. समितीने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीत धाबे यांच्या शोधप्रबंधात ५१ टक्के वाङ्‍मय चौर्य झाल्याचा निकष काढण्यात आला. तर प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्यासह तीन सदस्यीय विद्यापीठस्तरीय सत्यशोधन समितीच्या चौकशीत ६५ टक्के वाङ्‍मय चौर्य केल्याचा अहवाल देण्यात आला होता. या दोन अहवालांच्या आधारे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद व विद्या परिषद बैठकीत धाबे यांची पीएच. डी. रद्द करण्याची शिफारस कुलपतींकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

 मागील महिन्यांत कुलपतींकडे या प्रकरणाची सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान धाबे यांनी वाङ्‍मय चौर्यचा आरोप फेटाळून लावत आपण पूर्ण पाच वर्षे संशोधन करून प्रबंध योग्य प्रक्रियेतून सादर केल्याचे सांगितले. सुनावणीनंतर  कुलपतींनी विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय मान्य करून पीएच.डी. रद्द करण्यास मान्यता दिली. त्यामुळे विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच वाङ्‍मय चौर्यप्रकरणी पीएच.डी. रद्द करण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k