मधुमेही विद्यार्थ्यांना चालू वर्ग, परीक्षेदरम्यान खाद्यपदार्थ खाण्याची मुभा; ग्लुकोज चाचणीही करता येणार

टाईप १ मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि शाळेच्या इतर परीक्षेच्यावेळी मधुमेहाच्या गोळ्या (Diabetes Tablet) सोबत नेण्याची परवानगी असेल.

मधुमेही विद्यार्थ्यांना चालू वर्ग, परीक्षेदरम्यान खाद्यपदार्थ खाण्याची मुभा; ग्लुकोज चाचणीही करता येणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) विद्यार्थ्यांना अध्यन अध्यापन व मूल्यमापनामध्ये गरजेनुसार विविध सवलती दिल्या जातात. आता टाईप-१ मधुमेह (Diabetes Mellitus type) आजार असलेल्या विद्यार्थ्यांना अधिकच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने (Maharashtra Government) घेतला आहे. इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी या सुविधा देण्याबाबतचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून (School Education Department) जारी करण्यात आला आहे.

 

 

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाकडून याबाबत शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार टाईप-१ मधुमेह असणारे विद्यार्थी ज्यांना शाळेच्या सकाळच्या किंवा दुपारच्या सत्रामध्ये खाद्यपदार्थांची (Snaks) आवश्यकता भासल्यास अशा विद्यार्थ्यांना त्यांनी बाळगलेले खाद्यपदार्थ (Snaks) शाळेच्या वर्गखोलीत खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. डॉक्टरांनी खेळामध्ये भाग घेण्यास परवानगी दिलेल्या विद्यार्थ्यांना तशा आशयाचे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर शालेय खेळामध्ये सहभाग घेता येणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

Global Teacher Prize 2023 : ‘रस्त्यांवरचा शिक्षक' १३० देशांतील १० जणांच्या अंतिम फेरीत

 

टाईप १ मधुमेह असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि शाळेच्या इतर परीक्षेच्यावेळी मधुमेहाच्या गोळ्या (Diabetes Tablet) सोबत नेण्याची परवानगी असेल. अशा विद्यार्थ्यांनी सोबत आणलेले औषधे/फळे, खाद्यपदार्थ, पिण्याचे पाणी, बिस्किटे / शेंगदाणे/सुकामेवा इत्यादी परीक्षेच्या हॉलमध्ये शिक्षकांकडे ठेवण्यात याव्यात. आवश्यक असल्यास या बाबी अशा विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान द्याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

शाळेतील कर्मचाऱ्यांनी टाईप १ मधुमेह असलेल्या विद्यार्थ्यांना ग्लुकोमीटर आणि ग्लुकोज चाचणी पट्ट्या सोबत घेऊन जाण्याची परवानगी द्यावी. हे साहित्य परीक्षेदरम्यान परीक्षा हॉलमध्ये निरीक्षक किंवा शिक्षकांकडे ठेवता येईल. रक्तातील साखरेची चाचणी करण्याची आणि आवश्यकतेनुसार पदार्थांचे सेवन करण्याची परवानगी देण्यात येईल.

 

CGM (Continuous Glucose Monitoring), FGM (Flash Glucose Monitoring) आणि / किंवा इन्सुलिन पंप वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान ही उपकरणे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर Glucose Monitoring  साठी स्मार्ट फोन वापरण्यात येत असेल तर तो स्मार्ट फोन शिक्षक/निरीक्षक यांच्याकडे ठेवण्याची परवानगीही या शासन निर्णयाद्वारे देण्यात आली आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k