रॅप सॉंग, रिक्त पदे, परीक्षा विभागातील  कारभाराने अधिसभा गाजणार 

येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणारी आधिसभा वादळी ठरणार आहे. विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, याचाही जाब आधिसभा सदस्यांकडून विद्यापीठ प्रशासनाला विचारला जाऊ शकतो.

रॅप सॉंग, रिक्त पदे, परीक्षा विभागातील  कारभाराने अधिसभा गाजणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) आवारात चित्रीत करण्यात आलेले रॅप सॉंग (rap song), परीक्षा विभागाकडून (exam department) प्रसिद्ध केले जाणारे चुकीचे निकाल, त्यात दुरुस्तीस लावला जाणारा वेळ, विद्यापीठाच्या विभागातील रिक्त पदे (vacant posts in the department), सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे (Statue of Savitribai Phule) रखडलेले सुशोभीकरण या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर येत्या २८  ऑक्टोबर रोजी होणारी आधिसभा वादळी ठरणार आहे. तसेच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यापीठाकडून कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे, याचाही जाब आधिसभा सदस्यांकडून विद्यापीठ प्रशासनाला विचारला जाऊ शकतो.

हेही वाचा : शिक्षण विद्यापीठाने सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांना दिली दोन परीक्षांची संधी

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये एका वादग्रस्त रॅप सॉंगचे चित्रकरण झाले. चित्रीकरणासाठी रिवॉल्वर, तलवार, दारूच्या बाटल्या या वस्तूंचा वापर करण्यात आला. तसेच रॅप सॉंग मध्ये अश्लील शिव्यांचा भडिमार करण्यात आला. या वादग्रस्त रॅप सॉंगच्या चित्रिकराण्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालाचे काय झाले?  याबाबत अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर आधिसभेसमोर प्रश्न उपस्थित करणार आहेत.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आधिसभेत नेहमीच चर्चा होते. परंतु, अंतर्गत गुण देण्यात निर्माण झालेल्या तांत्रिक कारणांमुळे हजारो विद्यार्थ्यांचे निकाल चुकीच्या पद्धतीने जाहीर करण्यात आले. याबाबत दोषी असणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाही करण्यात आली. परंतु, परीक्षा विभागाकडे पाठपुरावा करूनही अनेक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला गेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले, याबाबत अनेक अधिसभा सदस्य प्रचंड नाराज आहेत. त्याचे पडसाद विद्यापीठाच्या आधिसभेत पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यावेळीही परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचे चित्र दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्यापीठाच्या आवारात सुमारे ५०  विभाग आहेत. त्यापैकी ४०  विभागांचा कारभार २० व्यक्तींकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज पाहण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. विद्यापीठातील वीस व्यक्तींकडे प्रत्येकी दोन विभागांच्या प्रमुख पदाचा कार्यभार आहे. विद्यापीठातील ३८४  मंजूर प्राध्यापकांपैकी सुमारे १५०  प्राध्यापकच  सध्या कार्यरत आहेत. त्यातही १११ पदांच्या भरतीची जाहिरात अद्याप विद्यापीठ प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. या विषयावरही आधिसभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेअंतर्गत मानधन वाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी केव्हापासून केले जाणार आहे .विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कामांमध्ये सुधारणा केली जाणार की नाही. हा विषय चर्चेसाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोरील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले जाणार होते. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून त्यावर कोणताही निर्णय घेतला गेला नाही. शासनाकडूनही यासाठी निधी मिळाला नाही. तसेच येत्या ३ जानेवारीपर्यंत तरी  पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणार नसल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यापीठाकडे पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी निधी नाही का ? असा प्रश्न एका अधिसभा सदस्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.