Global Teacher Prize 2023 : ‘रस्त्यांवरचा  शिक्षक' १३० देशांतील १० जणांच्या अंतिम फेरीत

जागतिक स्तरावर दिला जाणारा हा एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. १ दशलक्ष डॉलर हे पुरस्काराचे स्वरूप असून यासाठी १३० देशातील शिक्षकांची स्पर्धेत नोंदणी झाली होती.

Global Teacher Prize 2023 : ‘रस्त्यांवरचा  शिक्षक' १३० देशांतील १० जणांच्या अंतिम फेरीत
Deep Narayan Nayak

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

कोरोना (Covid 19) काळात शुकशुकाट असलेल्या रस्त्यांचे रूपांतर वर्गात आणि रस्त्यालगत असलेल्या भिंतीचे रूपांतर फळ्यात करणारे पश्चिम बंगालमधील (West Bengal) शिक्षक दीप नारायण नायक (Deep Narayan Nayak) यांना  जागतिक शिक्षक पुरस्कार २०२३ (Global Teacher Prize 2023) साठी १० अंतिम स्पर्धकांमध्ये स्थान देण्यात आले आहे. नायक यांना "रस्त्यांवरचा शिक्षक" (Teacher of the Streets) म्हणून ओळखले जाते.

 

जागतिक स्तरावर दिला जाणारा हा एक प्रतिष्ठित पुरस्कार समजला जातो. १ दशलक्ष डॉलर हे पुरस्काराचे स्वरूप असून यासाठी १३० देशातील शिक्षकांची स्पर्धेत नोंदणी झाली होती. नायक हे जमुरिया येथील तिलका मांझी आदिवासी प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. कोरोना काळात सगळीकडे ऑनलाईन क्लासेस सुरु असताना नायक यांनी मात्र गरीब आणि वंचित गटातील मुलांना एकत्र आणून ज्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष वर्ग सुरु केले, या कामाची दखल घेण्यात आली आहे.

पुस्तकांमध्ये इंडिया की भारत? NCERT चे तोंडावर बोट, संभ्रम वाढला

 

नायक यांच्याकडून वर्ग रस्त्यांवर भरवले जात होते, तर रस्त्यांवर असलेल्या भिंतीचा वापर त्यांनी फळा म्हणून केला. त्यांनी फक्त विद्यार्थ्यांनाच नव्हे तर पालकांमध्ये देखील जनजागृतीचे कार्य केले. पालकांना शिक्षित करणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे याद्वारे  मुले आणि समुदाय दोघांनाही सक्षम करण्याचे काम केले आहे.

 

 

युनेस्कोच्या सहाय्यक महासंचालक स्टेफानिया गियानिनी म्हणाल्या, “मुलांना आणि तरुणांना वेगाने विकसित होत असलेल्या जगात भरभराटीसाठी तयार करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल दीप नारायण सारख्या प्रेरणादायी शिक्षकांना मान्यता मिळायला हवी. शिक्षक भविष्यासाठी शिक्षणाला आकार देत आहेत. व्यवसायात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या तसेच समाजातील शिक्षकांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या अपवादात्मक शिक्षकाला हा पुरस्कार देण्यात येतो.

 

 

दरम्यान, ३ डिसेंबर २०२० रोजी, युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राइज महाराष्ट्रातील रंजितसिंह डिसले यांना जाहीर झाला होता. हा पुरस्कार मिळवणारे डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले. त्यानंतर आता दीप नारायण यांचाही अंतिम फेरीत समावेश झाल्याने तीन वर्षानंतर पुन्हा हा पुरस्कार भारतात येणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k