NEET-UG परीक्षेतील वादावर राहुल गांधी आक्रमक; संसदेत प्रश्न उपस्थित करणार 

NEET-UG परीक्षेतील वादावर राहुल गांधी आक्रमक; संसदेत प्रश्न उपस्थित करणार 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणूकानंतर सर्व सामान्य लोकांच्या चर्चेचा विषय बनलेल्या NEET- UG 2024 परीक्षेच्या वादात काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनीही आता उडी घेतली आहे. संसदेत (Parliament)परीक्षेत झालेल्या गैरप्रकारावर आवाज उठवत विद्यार्थ्यांचा आवाज बनणार असल्याचे राहुल गांधी यांनी त्यांच्या X हँडल वरून स्पष्ट केले आहे. 

राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला. गांधी यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे की, " मोदी यांनी शपथ घेण्यापूर्वीच परीक्षेतील अनियमिततेमुळे 24 लाखांहून अधिक विद्यार्थी उद्ध्वस्त झाले आहेत. एकाच परीक्षा केंद्रातील सहा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त गुण मिळवून परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या शक्य नसलेले गुण मिळाले आहेत, परंतु, सरकार सातत्याने पेपर फुटण्याची शक्यता नाकारत आहे."

राहुल गांधी म्हणाले , "शिक्षण माफिया आणि सरकारी यंत्रणा यांच्या संगनमताने सुरू असलेल्या या 'पेपर लीक उद्योगा'ला तोंड देण्यासाठी काँग्रेसने जोरदार योजना आखली आहे. "कायदा करून विद्यार्थ्यांना 'पेपर फुटीपासून मुक्ती' देण्याचा आम्ही आमच्या जाहीरनाम्यात संकल्प केला होता."

राहुल गांधी म्हणाले, "आज मी देशातील सर्व विद्यार्थ्यांना आश्वासन देतो की मी संसदेत तुमचा आवाज बनेन आणि तुमच्या भविष्याशी संबंधित मुद्दे जोरदारपणे मांडेन." 

 दरम्यान, शिक्षण मंत्रालयाने 1 हजार 500 हून अधिक उमेदवारांना दिलेल्या ग्रेस गुणांचे पुनरावलोकन करण्यासाठी चार सदस्यीय पॅनेल तयार केले आहे.
तर दुसरीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या राष्ट्रीय परीक्षेच्या सत्यतेवर अनेक पक्षांनी चिंता व्यक्त केल्याने या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. काँग्रेसने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी NEET मधील अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. तसेच भाजपवर तरुणांचा विश्वासघात आणि त्यांच्या भविष्याशी खेळण्याचा आरोप केला.