आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुण्यातील 53 शाळांचा नकार; विद्यार्थी नोंदणी 4-5 दिवसात सुरू होण्याची शक्यता 

पुण्यातील 53 शाळांनी आरटीई प्रवेशासाठी शाळा अद्याप नोंदणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेस पुण्यातील 53 शाळांचा नकार; विद्यार्थी नोंदणी 4-5 दिवसात सुरू होण्याची शक्यता 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई- RTE) 25 टक्के आरक्षित घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरूवात झाली असली तरी अद्याप पुण्यातील 53 शाळांनी आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणी केली नसल्याची माहिती समोर आली आहे.या शाळांकडून आरटीई प्रवेश देण्यास नकार (Refusal to grant RTE admission)दिला जात असून शिक्षण विभागाकडून (Education Department)या शाळांना आरटीईच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचे प्रयत्न केले जात आहेत.तसेच शासकीय सुट्ट्या असल्या तरी पुढील 4-5 दिवसात आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी (Student Registration for RTE Admission)सुरू केली जाणार आहे,असे शिक्षण विभागातील वारिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आरटीई प्रवेशासाठी शाळा नोंदणीसाठी मुदत देण्यात आली होती.मात्र,अनेक स्वयंअर्थसहाय्यित शाळांनी प्रवेशासाठी नोंदणी केली नाही.शासनाने आरटीई कायद्यात बदल केला आहे. त्यात शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम देण्याच्या नियमावलीत केलेल्या बदलामुळे शाळांकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यास विरोध दर्शवला जात आहे.यंदा राज्यातील 75 हजार 856 शाळांनी  नोंदणी केली असून यंदा आरटीई प्रवेशासाठी 9 लाख 70 हजारांहून अधिक जागा उपलब्ध होणार आहेत.मात्र,पुण्यातीलच काही शाळांनी आरटीई प्रवेशासाठी नोंदणी केली नसल्याचे समोर आले आहे.प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच शाळा आरटीईला विरोध करत असल्याचे दिसून येत आहे. 

पुणे जिल्हा परिषदेतील शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशासाठी 5 हजार 248 शाळा पात्र आहेत.त्यातील 5 हजार 195 शाळांनी नोंदणी केली आहे.उर्वरित 53 शाळा आरटीई प्रवेशासाठी लॉगिन करण्यास तयार नाहीत.या शाळांकडून प्रवेश देण्यास विरोध केला जात आहे.मात्र, शिक्षण विभाग आपल्या पातळीवर या शाळांची नोंदणी करून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
-----------------------------------

आरटीई प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी सुरू करण्याचे काम एनआयसीच्या माध्यमातून केले जात आहे.चालू आठवड्यात विद्यार्थी नोंदणी सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत.मात्र,काही कारणाने विलंब झाला तर पुढील आठवड्यात निश्चितपणे विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
 - शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण, महाराष्ट्र राज्य