आरटीई प्रवेश : प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणीस एप्रिल महिना उजाडणार ?

आरटीई प्रवेश :  प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणीस एप्रिल महिना उजाडणार ?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राबविल्या जाणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेस (rte admission process)सुरुवात झाली असली तरी शाळा नोंदणीच्या (school registration)प्रक्रियेसाठी येत्या 22 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या ५५ हजार ५०४ शाळांची नोंदणी झाली असून या शाळांमध्ये आरटीईच्या तब्बल 7 लाख 33 हजार 378 जागा उपलब्ध आहेत. त्यात पुढील काही दिवसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच आरटीई प्रवेशासाठी प्रत्यक्षात विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया (student registration process) सुरू होण्यास एप्रिल महिना (month of April) उजाडण्याची शक्यता असल्याची अशी चर्चा शिक्षण विभागातील अधिकारी करत आहेत. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25 टक्के आरक्षित जागेवर आरटीई अंतर्गत ऑनलाईन प्रवेश दिला जातो. यंदा आरटीई कायद्यात बदल करण्यात आल्यामुळे सरकारी व  खाजगी अनुदानित शाळा आरटीई प्रवेशाच्या कक्षेत आल्या आहेत. मात्र, या शाळेच्या परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यंदा आरटीई प्रवेशाकडे पालक पाठ फिरवतील,असे बोलले जात आहे. कारण अनेक पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आकर्षण आहे. आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिक्षण घ्यावे, असे त्यांना वाटते. त्यातच अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.त्यामुळे किती पालक आरटीई प्रवेशास प्रतिसात देतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आरटीओ अंतर्गत तब्बल 80 हजारांना अधिक शाळांची नोंदणी होईल. शिक्षण विभागाने दिलेल्या मुदतीमध्ये सुमारे 55 हजार शाळांनी नोंदणी केली होती. त्यामुळे प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयाने शाळा नोंदणीसाठी येत्या 22 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यात दरवर्षी पुणे जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या सर्वाधिक जागा असतात. मात्र, यंदा पुणे जिल्ह्यापेक्षा इतर जिल्ह्यांतील शाळांनी आरटीईसाठी अधिक नोंदणी केली आहे. आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्वात 3 हजार 949 शाळांनी आरटीई  प्रवेशासाठी नोंदणी केली असून नाशिक खालोखाल अहमदनगर जिल्ह्यातील 3 हजार 472 शाळांनी नोंदणी केली आहे. त्यानंतर पुणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर असून पुण्यातील एक 3 हजार 156 शाळांची नोंदणी झाली आहे.त्यात पुढील काही दिवसात वाढ होईल.