विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून

संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या  २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या हिवाळी सत्राच्या  परीक्षा येत्या २१ नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत.

विद्यापीठाच्या  हिवाळी सत्राच्या परीक्षा २१ नोव्हेंबरपासून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी (savitribai phule pune university ) संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या  २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा येत्या २१ नोव्हेंबर पासून टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहेत. परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर (Examination Schedule ) प्रसिद्ध केले जाणार आहे, असे  विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे (Mahesh Kakde, Director of Examination and Evaluation Board) यांनी स्पष्ट केले आहे. 

हेही वाचा : विद्यापीठातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण ; अधिसभा सदस्यांना आली जाग


सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सर्व विद्या शाखांच्या सर्व  प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. सर्व विद्याशाखेतील पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा तसेच पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान  पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या परीक्षा व विधी अभ्यासक्रमामधील पदवी स्तरावरील प्रथम वर्षाच्या आणि एलएलबी, बीएएलएलबी परीक्षांचे आयोजन महाविद्यालय स्तरावर करावयाचे आहे. महाविद्यालयांनी येत्या १० डिसेंबर पर्यंत परीक्षांचे आयोजन करावयाचे आहे.  तसेच याबाबत अंतर्गत गुण भरणे इतर सर्व कामे १५  डिसेंबर पूर्वी करणे अपेक्षित आहे.

पारंपरिक अभ्यासक्रमातील कला, वाणिज्य, विज्ञान व विधी पदवी स्तरावरील प्रथम वर्ष वगळून पदवी व पदव्युत्तर पदवी स्तरावरील अभ्यासक्रमाच्या सर्व वर्ष आणि  व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर स्तरावरील सर्व वर्षांच्या परीक्षांचे आयोजन विद्यापीठ स्तरावर करण्यात येणार आहे.

पदविका व प्रथम वर्ष पारंपरिक व विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे मूल्यमापन संबंधित महाविद्यालयाने केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्र म्हणून करावे. संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केंद्रीय मूल्यमापन प्रकल्प केंद्राचे संचालक म्हणून कामकाज पहावे. इतर परीक्षांचे मूल्यमापन विद्यापीठ स्तरावर केले जाणार आहे. केंद्रीय मूल्यमापन केंद्राबाबत परीक्षा विभागामार्फत स्वतंत्रपणे माहिती दिली जाणार आहे, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.