निकाल वेळेत लावा; चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यापीठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी

राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठातील परीक्षेच्या निकालाबाबत आज पाटील अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सर्व अकृषी विद्यापीठानी विहित मुदतीत निकाल जाहीर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पाटील यांनी दिल्या.

निकाल वेळेत लावा; चंद्रकांत पाटील यांच्याकडून विद्यापीठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी
Higher Education Minister Chandrakant patil Meeting

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास (SPPU) राज्यातील इतर अकृषि विद्यापीठांच्या बहुतेक पदवी परीक्षांचे अंतिम निकाल (University Results) रखडले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यात अडचणी येत आहेत. याबाबत तक्रारी वाढू लागल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरूवारी निकालांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेत कानउघाडणी केल्याचे समजते.  

राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठातील परीक्षेच्या निकालाबाबत आज पाटील अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सर्व अकृषी विद्यापीठानी विहित मुदतीत निकाल जाहीर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पाटील यांनी दिल्या. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर , उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त महेंद्र वारभुवन, राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठाचे अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

UGC ने बदलले विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीचे नियम; ‘पीएचडी’वर फुली

विद्यापीठांचे निकाल वेळेत लावले जात नसल्याने काही दिवसांपूर्वी राज्याचे राज्यपाल व कुलपती रमेश बैस यांनी खडसावले होते. पण त्यानंतर परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. बहुतेक विद्यापीठांचे निकाल रखडले आहे. विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनाचे निकालही लवकर मिळत नाही.

सीईटी परीक्षेचे निकाल लागून एमबीएसह इतर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश सुरू झाले आहेत. निकाल लवकर न लागल्यास विद्यार्थ्यांना प्रवेशात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यांचे शैक्षणिक नुकसानही होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडूनही आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पाटील यांनी बैठकीत निकाल वेळेत लावण्याबाबत अधिकाऱ्यांना सक्त ताकीद दिल्याचे समजते.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD