प्राध्यापक भरती गैरव्यवहार : नंदकुमार झावरे यांचा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

संस्थेच्या संचालक मंडळापैकी काही संचालकांनी थेट अध्यक्षांविरोधातच उभे ठाकत मतदान घेऊन त्यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला आहे.

प्राध्यापक भरती गैरव्यवहार : नंदकुमार झावरे यांचा अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये सहाय्यक प्राध्यापक भरतीतील (Assistant Professor Recruitment) गैरव्यवहाराच्या आरोपानंतर संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे (Nandkumar Zaware) यांनी शुक्रवारी (दि. ११) अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यामुळे शिक्षण (Education) क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संस्थेच्या संचालक मंडळापैकी काही संचालकांनी थेट अध्यक्षांविरोधातच उभे ठाकत मतदान घेऊन त्यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मांडला आहे. अध्यक्षांची तक्रार विद्यापीठाकडेही करण्यात आली आहे. (Professor recruitment malpractice: Nandkumar Zaware resigned from the post of president)

झावरे यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सचिवांना पत्र लिहिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, शंभर वर्षांपेक्षा जास्त गौरवशाली वारसा असलेली आपली संस्था अत्यंत बुध्दिमान, सामाजिक बांधिलकी असलेले प्राचार्य, अध्यापक, शिक्षक व सर्व कर्मचारी यांच्या कष्टांमुळे गुणवत्तेत सर्वोच्च संस्था, लाखो विद्यार्थी, पालक या सर्वांचे मी ऋण व्यक्त करून निरोप घेत आहे. संस्थेच्या अध्यक्षपदाचा आज हा राजीनामा देत आहे, असे झावरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

प्र-कुलगुरू नसल्याने रखडली अधिष्ठातांची निवड? अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

झावरे यांनी राजीनामा दिल्यानंतर ‘एज्युवार्ता’शी संवाद साधला. ते म्हणाले, राज्य सरकार, विद्यापीठाच्या नियमांनुसार प्राध्यापक भरतीमध्ये उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. विद्यापीठाने मान्यता दिलेल्या उमेदवारांची यादी संस्थेला पाठिवली आहे. त्यांना आता नियुक्ती देणे अपेक्षित असताना काही संचालकांनी परस्पर बैठक घेऊन ही यादीच अमान्य करण्याचा ठराव केला. हे कायद्याच्या विरोधात आहे. मी दहा वर्षे कायदे मंडळात होतो. कायद्याच्या विरोधात हे होत असल्याने मी आज राजीनामा दिला आहे. ठरावाचा फटका निवड झालेल्या उमेदवारांनाही बसणार आहे.  

काय आहे प्रकरण?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या या संस्थेत ७, ८, व ९ जुलै रोजी विविध उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. संस्थेच्या १० पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन उच्च शिक्षण संचालक व पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे दिले आहे. निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सहसचिव विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, सिताराम खिलारी, दीपलक्ष्मी म्हसे , कार्यकारी मंडळ सदस्य माणिकराव मोरे, दीपक दरे, शंतनु हापसे यांचा समावेश आहे.

नियमांचे उल्लंघन करून प्राध्यापक भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निवड समिती सदस्यांनी मुलाखती दरम्यान पेन ऐवजी पेन्सिलने उमेदवारांना गुण दिले आहेत . तसेच मुलाखती संपल्यानंतर समितीच्या सदस्यांनी आपल्या रिपोर्टवर नियोजित वेळेत स्वाक्षऱ्या केल्या नाहीत, त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, या मागणीचे निवेदन संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व विश्वास्तांनी १० जुलै रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे. तसेच भरतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत संस्थेच्या संचालक मंडळातील सदस्यांनी दि. ४ ऑगस्ट रोजी संस्थेच्या अध्यक्षावरच अविश्वास ठराव संमत केला आहे. पण त्याआधीच झावरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo