PSI गट- ब मुख्य परीक्षा २०२१ : पोलीस उपनिरीक्षक निकाल प्रसिध्द; अजय कळसकर राज्यात पहिला

या परीक्षेत पुण्यातील अजय कळसकर पुरुषांमध्ये तर मयुरी सावंत ही महिलांमधून राज्यात पहिले आले आहेत. 

PSI गट- ब मुख्य परीक्षा २०२१ : पोलीस उपनिरीक्षक निकाल प्रसिध्द; अजय कळसकर राज्यात पहिला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (Maharashtra Public Service Commission) दिनांक ९ जुलै, २०२२ (पेपर क्रमांक १) व दिनांक १७ जुलै, २०२२ (पेपर क्रमांक २) रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा २०२१ (Maharashtra Secondary Services Non-Gazetted, Group B Main Exam 2021) मधील पोलीस उपनिरीक्षक ३५८ पदांसाठीचा अंतिम निकाल जाहीर (Final result declared for Sub Inspector of Police) करण्यात आला आहे. या परीक्षेत पुण्यातील अजय कळसकर पुरुषांमध्ये तर मयुरी सावंत ही महिलांमधून राज्यात पहिले आले आहेत. 

पोलीस उपनिरीक्षक पदाचा संवर्गाच्या अनाथ आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण यांच्या आदेशानुसार अनाथांची ०२ पदे प्रस्तुत निकालामध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. गुणवत्ताधारक खेळाडूचा दावा केलेल्या शिफारसपात्र काही उमेदवारांसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या असल्यामुळे खेळाडू उमेदवारांचा निकाल राखून ठेवून उर्वरित ३५८ पदांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. खेळाडू उमेदवारांचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल.

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवाराचे गुण (Cut off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळून आल्यास अथवा आवेदनपत्रातील दाव्यानुसार आवश्यक प्रमाणपत्रांची पूर्तता नियुक्तीच्यावेळी न केल्यास, शासनस्तरावर अधिसूचनेतील तरतूदीनुसार दावे तपासतांना व अन्य कारणामुळे अपात्र ठरणाऱ्या संबंधित उमेदवारांची उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्धपत्रात म्हटले आहे.