विद्यापीठाच्या बोगस डिग्रीचे ठाणे कनेक्शन; टीईटी घोटाळ्याची पुनर्रावृत्ती? 

वैभव जाधव हा इंडसइंड बॅंकेत कामाला आहे. बॅंकेने त्याचे कागदपत्र दौंड येथील काटारिया कॉलेज व पुणे विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठवले होते.दोघांनी हे कागदपत्र बोगस असल्याचे कळवले होते.

विद्यापीठाच्या बोगस डिग्रीचे ठाणे कनेक्शन; टीईटी घोटाळ्याची पुनर्रावृत्ती? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University)बोगस डिग्रीचे कनेक्शन (bogus degree connection)ठाण्यापर्यंत जाऊन पोहचले असून विद्यापीठाने विद्यार्थाविरोधात चतु:शृंगी पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुणे पोलिसांनी गुन्ह्याचा तपास ठाणे पोलिसांकडे वर्ग केला आहे.मात्र, विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित विद्यार्थी हा त्यांची डिग्री एका संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगत होता.त्यामुळे टीईटी घोटाळ्यासाठी (TET scam) वापरलेली पद्धती विद्यापीठाच्या बोगस डिग्रीसाठी वापरली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.त्यामुळे  राज्यात बोगस डिग्रीचे रॅकेट (Bogus degree racket) कार्यरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे अधिकारी ज्ञानेश्वर साळुंके यांनी बोगस डिग्री प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.पोलिसांनी वैभव सुभाष जाधव (रा.सेवा संघ चाळ, रोड क्र.34, इंदिरा नगर , रुपदेवी पाडा नं 2, वागळे इस्टेट, ठाणे )यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.गुन्हा घडण्याचे ठिकाण आणि गुन्हेगार दोन्ही ठाणे येथील असल्यामुळे पुणे पोलिसांनी ठाणे शहर येथील कापूरवाडी पोलीस ठाणे येथे गुन्हा वर्ग केला आहे.

विद्यापीठाकडे खासगी कंपनी मार्फत वैभव जाधव याचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी आले. त्यावेळी त्याने सादर केलेले सर्व कागदपत्र बोगस असल्याचे समोर आले.त्यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या परवानगीनंतर पोलिसांकडे तक्रार दिली.विद्यापीठाने स्वत:हून पुढाकार घेऊन गुन्हा दाखल केल्याने बोगस डिग्रीचे रॅकेट समोर येऊ शकते.

टीईटी घोटाळ्यात उमेदवारांना बनावट प्रमाणपत्र देण्यात आले होते. तसेच संबंधित प्रमाणपत्र एका बनावट वेबसाईटवर आपलोड करण्यात आले होते. त्यामुळे आपल्याला मिळालेले प्रमाणपत्र हे खरे आहे,असा अनेकांचा समाज झाला होता. हीच पद्धत विद्यापीठाच्या बोगस डिग्रीसाठी वापरली असावी,अशी शक्यता आहे. कारण वैभवने विद्यापीठातील अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार त्याला एका वेबसाईटवर त्यांची डिग्री दिसत होती. त्यामुळे आता वैभवला ही बोगस डिग्री कोणी दिली. वैभव सह अशा किती विद्यार्थ्यांना बोगस डिग्रीचे वाटप करण्यात आले आहे.हे पोलीस तपासानंतरच समोर येईल.

दरम्यान, वैभव जाधव हा इंडसइंड बॅंकेत कामाला आहे. बॅंकेने त्याचे कागदपत्र दौंड येथील काटारिया कॉलेज व पुणे विद्यापीठाकडे तपासणीसाठी पाठवले होते.दोघांनी हे कागदपत्र बोगस असल्याचे कळवले होते. मात्र, माझे कागदपत्र खरे आहेत,असा दावा वैभव विद्यापीठातील अधिकाऱ्यांसामोर करत होता.त्यानंतर विद्यापीठाने या प्रकरणी गुन्हा दाखल केला. 

--------------------------------------------------

केवळ डिग्री सर्टिफिकेटच नाही तर वैभव जाधवकडे तीनही वर्षाच्या बोगस मार्क्सशीट होत्या.विद्यापीठाच्या नावाच्या बोगस डिग्रीचा गैरवापर होत असल्याने विद्यापीठाने संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.विद्यापीठाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.तसेच पोलिसांकडे या घटनेच्या तपासासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. 
- डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यामापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ