शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देणारे उद्योजक घडावेत : राज्यपाल

नव्या पिढीने नवोन्मेषक, उद्योजक, नवप्रवर्तक आणि आव्हाने स्विकारणारे व्यावसायिक व्हावे.

शिक्षणाच्या माध्यमातून नवकल्पनांना चालना देणारे उद्योजक घडावेत : राज्यपाल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जगातील यशस्वी सेवा उद्योग सुरूवातीस एक नवकल्पना होते, प्रयत्न आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी पुढे यश मिळविले. आज देशात अशा नवकल्पनांची निर्मिती करणारे, त्यांना चालना देणारे यशस्वी तरुण उद्योजक (Young entrepreneur)घडविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस(Governor Ramesh Bais)यांनी केले.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझीनेस मॅनेजेमेंटच्या (Pune Institute of Business Management)१४ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास वीकफील्ड कंपनीचे कार्यकारी संचालक डी. एस. सचदेवा, आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराय मेत्री, पीआयबीएम गुपचे अध्यक्ष रमण प्रीत आदी उपस्थित होते.

राज्यपाल बैस म्हणाले, नव्या पिढीने नवोन्मेषक, उद्योजक, नवप्रवर्तक आणि आव्हाने स्विकारणारे व्यावसायिक व्हावे. त्यांच्यामध्येही एखादा मार्क झुकरबर्ग दडलेला असेल. आज कुशल मनुष्यबळासाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे आहे. जगातले अनेक देश व्यापारासाठी चीनला पर्याय शोधत आहेत. युवकांना कौशल्याचे आणि नवनिर्मितीचे प्रशिक्षण देवूनच देशाला या संधीचा लाभ घेता येईल.

देशाला विकसित राष्ट्र करण्याच्या या परिवर्तनकारी यात्रेत प्रत्येक स्नातकांने आपली भूमिका निभावण्याची गरज आहे. व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी आणि उद्योजकांनी जागतिक स्तराच्या लेखा परिक्षण आणि व्यवस्थापन संस्था तसेच सल्लागार संस्था उभाराव्यात. जागतिक दर्जाच्या कायदे विषयक सल्ला देणाऱ्या संस्था आपल्या देशात तयार व्हाव्यात. संपत्ती निर्माण करणारे आणि स्टार्ट अप्सचे प्रवर्तक स्नातक भारतीय विद्यापीठांमधून घडावेत. देशातील ५० टक्क्यापेक्षा अधिक रोजगार कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, फलोत्पादन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता शिक्षण, आरोग्य आणि इतर सेवा क्षेत्रांना प्रभावित करणार आहे. व्यवस्थापन स्नातक आणि व्यवसाय व्यवस्थापकांनी देशाच्या विकासासाठी एआय शक्तीचा उपयोग करण्यात भारताला अग्रेसर ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पदवीदान समारंभात एमबीएच्या ३२३ व पीजीडीएमच्या ३५९ अशा एकूण ६८२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात  सुवर्णपदक  आणि पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.