बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषीला द्यायचीये 'लॉ'ची परीक्षा; न्यायालयाने केली विद्यापीठाकडे विचारणा 

मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी मागील 17 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषीला द्यायचीये 'लॉ'ची परीक्षा; न्यायालयाने केली विद्यापीठाकडे विचारणा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मुंबईतील काही लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये 11 जुलै 2006 रोजी सात बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Blast)झाले. यामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला आणि  824 जण जखमी झाले. या प्रकरणाचा दोषी मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी (Mohammad Sajid Margoob Ansari)मागील 17 वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दरम्यान, तुरुंगातूनच त्याने कायद्याचा अभ्यास (study of law) केला. आता त्याला कायद्याची परीक्षा द्यायची आहे. या संदर्भात अन्सारी ला ऑनलाइन कायद्याच्या परीक्षेला बसण्याची परवानगी देता येऊ शकतो  का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाकडे (Mumbai University) केली आहे. 

अन्सारीने 3 मे ते 15 मे या कालावधीत दक्षिण मुंबईतील सिद्धार्थ लॉ कॉलेजने घेतलेल्या दुसऱ्या सत्रातील कायद्याच्या परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला शारीरिकरित्या परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि नाशिक मध्यवर्ती कारागृह अधिकाऱ्यांना अन्सारीला परीक्षेच्या तारखांना महाविद्यालयात घेऊन जाण्याचे निर्देश दिले होते. पण नंतर अन्सारी याने 10 मे रोजी न्यायालयात अर्ज करून कळवले की तो ३ आणि 9 मे रोजी झालेल्या परीक्षेला उपस्थित राहू शकला नाही, तरी त्याला परीक्षेला बसण्याची परवानगी मिळावी. 

मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे की,  "सुरक्षेची चिंता लक्षात घेऊन उमेदवाराला ऑनलाइन माध्यमातून उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाऊ शकते का? " अशा उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्याची परवानगी देण्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 10 जून रोजी होणार आहे

न्यायालयाने म्हटले आहे की, "आम्ही मुंबई विद्यापीठाच्या सक्षम अधिकाऱ्याला विनंती करतो की त्यांनी या पैलूकडे लक्ष द्यावे आणि एटीएस (महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक) सह सर्व संबंधितांशी सल्ला मसलत करून आपली भूमिका रेकॉर्डवर ठेवावी."