TET परीक्षेत 82 गुणांना पास की 83 गुणांना? उमेदवारांचा आक्षेप 

काही उमेदवारांना 82 गुण मिळूनही ते उमेदवार टीईटी परीक्षेत पात्र ठरले नाहीत. 83 गुण असणारे उमेदवारच उत्तीर्ण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु,याबाबत आता उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.

TET परीक्षेत 82 गुणांना पास की 83 गुणांना? उमेदवारांचा आक्षेप 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेत दीडशे पैकी किती गुणांना उमेदवार पास असेल याबाबत आता शिक्षण क्षेत्रात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. देशातील काही राज्यांमध्ये उमेदवारांना 82 व त्यापेक्षा कमी गुणांना उत्तीर्ण केले जाते. मात्र, महाराष्ट्रात उमेदवारांना उत्तीर्ण होण्यासाठी 83 गुण आवश्यक असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहेत. परंतु, मागील वर्षी अनेक उमेदवार 82 गुण घेऊन उत्तीर्ण झाले होते.त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेने 82 गुणांचा विचार करून सर्व उमेदवारांना उत्तीर्ण करावे,अशी मागणी केली जात आहे.

टीईटी परीक्षेचा निकाल उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना किती गुण मिळाले आहेत, याबाबतची माहिती त्यांना उपलब्ध झाली आहे. परंतु ,काही उमेदवारांना 82 गुण मिळूनही ते उमेदवार टीईटी परीक्षेत पात्र ठरले नाहीत. 83 गुण असणारे उमेदवारच उत्तीर्ण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु,याबाबत आता उमेदवारांनी आक्षेप घेतला आहे.केवळ एक गुण कमी असल्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर गडा येणार आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केली आहे. 

राज्य परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अंतरिम निकालावर 21 जानेवारीपर्यंत आक्षेप मंगविण्यात आले आहेत. त्यात बहुतांश उमेदवारांनी 82 गुणांना उत्तीर्ण का केले जात नाही,असा आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी 82 गुणांना उत्तीर्ण झालेले उमेदवारांचे संदर्भही राज्य परीक्षा परिषदेकडे पाठवले आहेत. त्यामुळे परीक्षा परीक्षेच्या अधिकाऱ्यांकडून ही बाब गांभीर्याने घेण्यात आली आहे, असे विश्वासनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे परीक्षा परिषद टीईटी उत्तीर्णतेच्या संदर्भात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, प्रिंटिंग मिस्टेक मुळे टीईटी परीक्षेतील काही प्रश्न रद्द करावे लागले. त्यामुळे परीक्षेत उत्तीर्ण होण्याच्या गुणांकनामध्ये बदल झाला आहे. प्रश्न रद्द होण्यात उमेदवारांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे प्रश्न रद्द करून आणि रद्द केलेल्या प्रश्नाचे गुण वजा करून निकाल लावण्याऐवजी रद्द केलेल्या प्रश्नांचे सरसकट गुण उमेदवारांना द्यावेत, अशीही मागणी शिक्षक वर्गाकडून केली जात आहे.