मुंबई महापालिकेच्या सीबीएसईए, आयसीएसई, शाळा प्रवेशासाठी यंदा सर्वाधिक अर्ज
आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा सुरू केल्या. पालिकेने २०२१ मध्ये आणखी दहा ठिकाणी सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्याही एक एक शाळा सुरू करण्यात आल्या.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) २२ सीबीएसईए आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई शाळांमध्ये (CBSE, ICSE, IB, IGCSE schools) नर्सरी प्रवेश प्रक्रियेच्या (Nursery admission process)ऑनलाईन अर्जसाठी १ जानेवारीपासून सुरू. अर्ज करण्याची मुदत २६ जानेवारी रोजी संपल्यानंतर एकूण अर्जाचा आकडा आता समोर आला आहे. पालिकेच्या २२ शाळांमध्ये १ हजार ५१४ जागा आहेत. त्यासाठी यंदा सर्वाधिक २ हजार ४०७ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रवेश हे लाॅटरी पद्धतीने (Admission by lottery) दिले जाणार आहेत.
अर्ज प्रक्रिया संपली असून ३० जानेवारीला पाल्यांची यादी जाहीर होणार आहे. ज्युनियर केजीमध्ये आणि २७२ जागांसाठी ६४३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर सीनियर केजीमध्ये २७२ जागांसाठी ५७५ अर्ज आणि पहिलीसाठी २३८ जागांसाठी ४२२ अर्ज दाखल झाले आहेत. या शाळांमध्ये ५ टक्के जागा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी, तर १० टक्के जागा महापौरांच्या शिफारशीनुसार प्रवेश देण्यासाठी राखीव ठेवल्या जातात. खासगी शाळांतील शिक्षण महाग झाल्याने पालकांची पालिका शाळांना पसंती मिळत आहेत.
मुंबईत २०२० मध्ये जोगेश्वरी पूर्वेकडील पूनमनगरमध्ये पालिकेची शाळेत सीबीएसईची पहिली शाळा सुरू झाली. मुंबई महापालिकेच्या या शाळेला पालकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर पालिकेने अन्य ठिकाणीही आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा सुरू केल्या. पालिकेने २०२१ मध्ये आणखी दहा ठिकाणी सीबीएसईच्या शाळा सुरू केल्या. तसेच आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई मंडळाच्याही एक एक शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
त्यानंतर पालिकेने सीबीएसई शाळेतील छोटा शिशू व बालवाडी वर्गाचीही एक एक तुकडी वाढवली होती. पालिकेच्या केंद्रीय व आंतरराष्ट्रीय मंडळांच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज येत असतात. त्यामुळे पालिकेच्या या शाळांचे प्रवेश हे लॉटरी पद्धतीने होत असतात. अन्य मंडळांच्या खासगी शाळांचा खर्च परवडत नसल्यामुळे सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना या शाळांमध्ये जाता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या शाळांना मोठा प्रतिसाद असतो.