शाळेत भ्रष्ट्राचार: सगळं केवळ कागदावर,सरपंचाच्या पतीने पैसे काढले; चिमुकलीच अजित पवारांना भावनिक पत्र
ऊसतोड मजूरांची मुले शाळेत कसे जातील आणि त्यांना इतरांपेक्षा अधिकच्या काय सुविधा देण्यात येतील हे अपेक्षित असताना शासन आणि प्रशासनाची जिल्ह्यातील शिक्षणाच्या बाततील अनास्था समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या जिल्हाचे पालककत्व आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
बीड जिल्हा पुन्हा (Beed District School News) एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता चर्चेत येण्याचे कारण मात्र जरा वेगळे आहे. नेहमी गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीने हादरून टाकणाऱ्या बीडने आता मात्र शाळेची विदारक परिस्थिती समोर आणली आहे. एका चिमुकल्या विद्यार्थिनीला शाळा शिकायची आहे, परंतू शाळेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने तिने जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनाच थेट पत्र लिहिले आहे. त्यामुळे केवळ कागदावरच असलेल्या शाळेचा विकास चव्हाट्यावर आला आहे. सध्या या चिमुकलीचे पत्र सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या बीड जिल्हाचे खरे रूप समोर आले आहे. या मुलीने उपमुख्यमंत्र्यांना लिहिलेले केवळ एक पत्र (A student's letter to Ajit Pawar) नाही तर, येथील राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या तोंडात मारणारी चपराक आहे.
बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून केली जाते. असे असताना शासन आणि प्रशासनाने या जिल्ह्यासाठी अधिकच्या शैक्षणिक सुई-सुविधा देणे आवश्यक आहे. ऊसतोड मजूरांची मुले शाळेत कसे जातील आणि त्यांना इतरांपेक्षा अधिकच्या काय सुविधा देण्यात येतील हे अपेक्षित असताना शासन आणि प्रशासनाची जिल्ह्यातील शिक्षणाच्या बाततील अनास्था समोर आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या जिल्हाचे पालककत्व आहे. या मुलीच्या धाडसाचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.
चिमुकीने लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?
प्रति, अजित काका उर्फ दादा पवार
विषय- आमच्या शाळेसाठी मदत हवी आहे काका
आदरणीय अजित दादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री व पालकमंत्री बीड जिल्हा)
नमस्कार दादा आणि माझे काका मी बीड जिल्ह्यातील परभणी केसापुरी गावातल्या जिल्हा परिषद शाळेत शिकणारी एक साधी मुलगी आहे. आज पहिल्यांदाच इतक्या मोठ्या माणसाला पत्र लिहीत आहे. हात थरथरतोय पण मनातलं दुख कोणाला तरी सांगायलाच हवा म्हणून धीर करून हे पत्र लिहीत आहे.
दादा आमची ही शाळा नावापुरती नसून आमच्यासाठी ज्ञानमंदिर आहे. येथील सर्व शिक्षक वृंद आमच्यासाठी शिकवताना आमच्या भविष्यासाठी ज्ञानार्जनाची शिदोरी आमच्या कायम पाठीशी उभे राहतील, इतके ज्ञानी, सज्जन आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक वृंद आम्हाला लाभले आहेत. पण तिथे शिकण्यासाठी कुठलीच सोय नाही, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, नाही हात धुण्यासाठी हँडवॉश नाही, खेळण्यासाठी साधं साहित्यही नाही, तरीही आम्ही शाळेत येतो. कारण आम्हाला शिकायचं आहे.
पण दादा कागदावरच मात्र सगळं आहे असं दाखवलं जातं. आमच्या शाळेत सगळी व्यवस्था झाली आहे, असं सांगून लाखो रुपये काढले गेले आहेत, असं आम्हाला कळतंय. सरपंच बाईंचे पती हे सगळं पाहतात म्हणे, पण आम्हाला मात्र काहीच मिळालेलं नाही. आम्ही रोज रिकाम्या डोळ्यांनी शाळेकडे पाहतो. दादा आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? आणि स्वप्न नाहीत का? आम्हालाही डॉक्टर, शिक्षक, अधिकारी व्हायचं आहे. पण शाळेतच सोय नसेल तर आम्ही कसं पुढे जाणार? काका तुम्ही आमचे पालकमंत्री आहात, हा तुमचा जिल्हा आहे, आम्ही फार काही मागत नाही, फक्त शिकण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा, स्वच्छ पाणी, स्वच्छ शौचालय, खेळाचे साहित्य आणि आमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी व्यवस्था द्या. दादा हे माझं पत्र वाचताना कदाचित तुम्हाला मी फार लहान वाटेल. पण आमचं दुख मोठा आहे. एकदा तरी आमच्या शाळेकडे लक्ष द्या. तुमच्या एका निर्णयाने आमचा आयुष्य बदलू शकत.
आपलीच
परभणी केसापुरी गावातील जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी