विद्यार्थ्यांनी जीवनात संधी शोधावी - राज देशमुख
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शैक्षणिक व व्यावसायिक संधी शोधावी. या संधीतूनच मोठी स्वप्न बघा तरच तुमच्या ध्येयात तुम्ही यशस्वी व्हाल, असा सल्ला चांगुल चळवळ संस्थेचे अध्यक्ष राज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गॅदरिंग व बक्षीससमारंभ हा वर्षभराचे ताण कमी कमी करत असतो, हे करताना विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शैक्षणिक व व्यावसायिक संधी शोधावी. या संधीतूनच मोठी स्वप्न बघा तरच तुमच्या ध्येयात तुम्ही यशस्वी व्हाल, असा सल्ला चांगुल चळवळ संस्थेचे अध्यक्ष राज देशमुख यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अर्हम फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात अर्हम कला व वाणिज्य, अर्हम विधी, अर्हम कनिष्ठ, अर्हम माहिती तंत्रज्ञान, तसेच अर्हम एट्रिपलआयएस या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, राज देशमुख बोलत होते. कार्यक्रमास क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक सुदाम शेळके, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, सचिव डॉ आतिश चोरडिया, खजिनदार श्रीकांत पगारिया, आयटी प्रमुख स्वराज पगारिया तसेच विविध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश भोसले, डॉ मेहबुबसाब नगरबावडी, डॉ नेहा पाटील, डॉ अमन मिश्रा, प्रभा बटवाल यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे डॉक्टर सुदाम शेळके यांनी खेळातून कुशलता कशी साधता येईल, शैक्षणिक करिअर करताना खेळ सुद्धा महत्त्वाचा आहे. भविष्यात करिअर करण्याची संधी सोडू नये, असे विद्यार्थ्यांशी संवाद करताना सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गणेश वंदना सादर करून केली. प्राचार्या प्रभा बटवाल यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ नेहा पाटील यांनी अर्हम फाउंडेशन व इतर महाविद्यालयांचे तपशीलवार माहिती आपल्या प्रस्तावनेत दिली. फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शैलेश पगारीया यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे, महाराष्ट्रसह विविध सात देशांत फाउंडेशनचे शैक्षणिक जाळे पसरले असून हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन उच्चभु पदांवर कार्यरत असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे बारा खेळाडूंना ट्रॉफी व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा ६० व शैक्षणिक गुणवत्तेत प्रावीन्यप्राप्त विविध महाविद्यालयांतर्गत ६५ विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. विविध गुणदर्शन कार्यक्रमात अनुक्रमे गायन व नृत्य प्रकारात गणेश वंदना, मायभवानी, मायकल-जॅक्सनब्रेक डान्स, लल्लाटी -भंडार, आईगिरी -नंदिनी, क्लासिकल, लावणी, दक्षिण-भारतीय, महाभारत, ढोली-तारो या गाण्यावर नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केलीत. यावेळी प्राचार्य डॉ सतीश भोसले सेवानिवृत्त होत असल्याने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ अमन मिश्रा यांनी उपस्थित पाहुणे विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता, "वंदेमातरम" या गीताने झाली