सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन

 खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस या संकल्पनेचे कौतुक करत टपाल विभाग आधुनिक व हायटेक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पोस्ट ऑफिस ही विश्वासावर उभी असलेली संस्था असून सुकन्या समृद्धी योजना, पोस्टल विमा यांसारख्या बचत योजना आजही नागरिकांचा विश्वास जपून असल्याचे त्यांनी नमूद केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील गणेशखिंड पोस्ट ऑफिस येथे नेक्स्ट जनरेशन (N-Gen) पोस्ट ऑफिसचे उद्घाटन  मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यापीठ परिसरात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व नागरिक-केंद्रित सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या प्रगत व नवोन्मेषी वाटचालीला आणखी बळ मिळाले आहे. या उद्घाटन समारंभास राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, महाराष्ट्र व गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल  अमिताभ सिंग, पुणे क्षेत्राचे डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस अभिजीत बनसोडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस या संकल्पनेचे कौतुक करत टपाल विभाग आधुनिक व हायटेक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पोस्ट ऑफिस ही विश्वासावर उभी असलेली संस्था असून सुकन्या समृद्धी योजना, पोस्टल विमा यांसारख्या बचत योजना आजही नागरिकांचा विश्वास जपून असल्याचे त्यांनी नमूद केले.

चीफ पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांनी, N-Gen पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जुना भारत आणि नवा भारत यांचा सुंदर संगम साधला जात असल्याचे सांगितले. सर्व आधुनिक सुविधा असलेले हे पोस्ट ऑफिस नव्या पिढीसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस अभिजीत बनसोडे यांनी आपल्या भाषणात N-Gen पोस्ट ऑफिसची आवश्यकता आणि त्यामागील रोडमॅप सविस्तरपणे स्पष्ट केला. बदलत्या काळातील नागरिकांच्या अपेक्षा, डिजिटल व्यवहारांची वाढ तसेच वेगवान, पारदर्शक सेवा देण्याची गरज लक्षात घेऊन टपाल विभागाने ही संकल्पना राबवली असल्याचे त्यांनी सांगितले. युवकांनी या आधुनिक पोस्टल सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

 डॉ. विजय खरे यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसच्या सेवांचा सक्रिय वापर करून त्याचा शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात उपयोग करून घ्यावा, असे सांगितले. या N-Gen पोस्ट ऑफिसच्या उभारणीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा थेट सहभाग लाभला असून, त्यांच्या योगदानामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रफुल्ल कार्ले व त्यांच्या टीमने साकारलेली वारली पेंटिंग व कलात्मक सजावट विशेष आकर्षण ठरली. या उपक्रमासाठी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून, मीडिया कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख प्रा. माधवी रेड्डी यांनीही कलात्मक सजावटीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रवर अधीक्षक श्री. नितीन येवला यांनी सर्व मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या उपक्रमामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आधुनिक सुविधा उपलब्ध होऊन विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांना दर्जेदार व तंत्रज्ञानसक्षम सेवा मिळणार आहेत.