कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मेंदू अधिक प्रभावी : डॉ.पंडित विद्यासागर

व्यक्तिमत्व विकासासाठी आणखी एका गोष्टीच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी धावले पाहिजे ते म्हणजे वाचन, आणि वाचनातून विद्यार्थ्यांना स्वतःचा शोध लागण्याची शक्यता सर्वाधिक असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत वाचन करत राहिले पाहिजे. जगाच्या पाठीवर यशस्वी झालेल्या माणसांमध्ये केवळ वाचनातूनच आमुलाग्र बदल झाला असल्याचे मत यावेळी पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा मानवी मेंदू अधिक प्रभावी : डॉ.पंडित विद्यासागर

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सर्वांच्या तोंडी कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असला तरी कृत्रिम बुद्धिमत्तेवर मात करण्याची ताकद नैसर्गिकरित्या तयार झालेल्या मानवी मेंदूतच असल्याचा ठाम विश्वास ख्यातनाम संशोधक , विज्ञान साहित्यिक आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केला.

सोमेश्वरनगर (ता.बारामती ) येथील मु .सा. काकडे महाविद्यालयाच्या मुगुट महोत्सवाच्या पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे- देशमुख होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक आर.एन.(बापू) शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, महाविद्यालयाचे सचिव श्री. सतीश लकडे ,व्यवस्थापन समितीचे सदस्य प्रा.विलास बोबडे, प्रा.भीमराव बनसोडे, प्रा.धोंडीराम आगवणे, मुगुट महोत्सव प्रमुख डॉ.गेनू उर्फ अजय दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.                    ‌‌  

डॉ.पंडित विद्यासागर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या पाठीमागे लागून तरुणांनी आपले भविष्य खराब करून घेऊ नये. मात्र या तंत्रज्ञानापासून स्वतःला दूरही ठेवू नये. तसेच महाविद्यालयामध्ये होणारे विविध उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे असतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून घ्यावा, असा आशावाद डॉ. विद्यासागर यांनी व्यक्त केला.

व्यक्तिमत्व विकासासाठी आणखी एका गोष्टीच्या पाठीमागे विद्यार्थ्यांनी धावले पाहिजे ते म्हणजे वाचन, आणि वाचनातून विद्यार्थ्यांना स्वतःचा शोध लागण्याची शक्यता सर्वाधिक असते त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतत वाचन करत राहिले पाहिजे. जगाच्या पाठीवर यशस्वी झालेल्या माणसांमध्ये केवळ वाचनातूनच आमुलाग्र बदल झाला असल्याचे मत यावेळी पंडित विद्यासागर यांनी व्यक्त केले.

सतीश काकडे देशमुख यांनी महाविद्यालयातील गुणी विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे कौतुक केले. प्रास्ताविक मुगुट महोत्सवाचे प्रमुख डॉ.गेनू दरेकर यांनी केले. यावेळी त्यांनी मुगुट महोत्सवातील कार्यक्रमांचा आढावा घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी महाविद्यालयातील वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला. यावेळी 'मुगुट' या वार्षिकांकाचे प्रकाशन व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. संजू जाधव यांच्या "पॅराडीम्सऑफ एक्झिस्टन्ससियालिझम इन द सिलेक्टेड  नाॅव्हेल्स ऑफ अनिता देसाई" या  व बीबीसीए चे प्रमुख प्रा. रजनीकांत गायकवाड व प्रा. प्रियंका होळकर या लेखकांनी लिहिलेल्या 'डिजिटल बँकिंग' या संदर्भ ग्रंथाचे प्रकाशन डॉ. पंडित विद्यासागर यांच्या हस्ते आणि व्यासपीठावरील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात प्राविण्य व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचे व क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
         
दरम्यान, मुगुट महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देविदास वायदंडे यांच्या शुभहस्ते झाल्यानंतर शितल पाटील व संभाजी ससाणे यांची मुख्य भूमिका असणारा व शेखर बापू रणखांबे दिग्दर्शित 'रुबाब" या चित्रपटाचे प्रमोशन विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले.  त्यानंतर'काव्य मैफिल' याचे आयोजन करण्यात आले होते. कवी हनुमंत चांदगुडे, सुमित गुणवंत, कवी चंद्रकांत चाबुकस्वार, कवी अनिल कदम, कवी सोमनाथ सुतार, कवी संतोष शेंडकर उपस्थित होते. त्यांनी शेतकरी, आई, वडील, राजकीय या विषयावर भाष्य करणाऱ्या कवितांचे सादरीकरण केले. तसेच प्रेमकवितांबरोबरच शेणा मातीतल्या कवितांना ही विद्यार्थ्यांनी दाद दिली. ग्रामीण भागातील युवकांचे, शेतीचे, जागतिकीकरणाने आलेल्या अस्वस्थतेचे प्रश्न कवीनी आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडले.