धमकी वजा सूचनांच्या विरोधात शिक्षक संघटनांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा 

अशैक्षणिक कामांच्या सक्तीविरोधात राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक

 धमकी वजा सूचनांच्या विरोधात शिक्षक संघटनांचा आयुक्त कार्यालयावर मोर्चा 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 केंद्र सरकारच्या नवभारत साक्षरता सर्वेक्षण कार्यक्रमावर (Navbharat Literacy Survey Programme)शिक्षकांनी यापूर्वीच बहिष्कार टाकला आहे.मात्र, गेल्या दहा दिवसांपासून नवभारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची शिक्षकांवर सक्ती (force on teachers)केली जात आहे.तसेच विना वेतन करू, वेतनवाढी रोखू, फौजदारी गुन्हे दाखल करू, अशा धमकी वजा सूचना दिल्या जात आहेत. या सक्तीविरुद्ध तसेच शिक्षकांवर सातत्याने लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामविरोधात (Non-academic work) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बुधवारी ( दि.२७ ) शिक्षण आयुक्त कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

अशैक्षणिक कामांच्या सक्तीविरोधात राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.तरीही शिक्षकांवर या कामाची सक्ती केली जात आहे.त्यामुळेच अशैक्षणिक कामांचे अतिरिक्त ओझे शिक्षकांच्या खांद्यावर टाकू नका, या मागणीसाठी संघटना मोर्चा काढणार आहे, असे संघानेतर्फे काळवण्यात आले आहे.दरम्यान, नवभारत साक्षरता कार्यक्रम पूर्णपणे अशैक्षणिक स्वरूपाचा कार्यक्रम असल्याचा दावा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने केला असून सुरुवातीपासूनच या कामावर बहिष्कार टाकलेला आहे. 

हेही वाचा : प्री- प्रायमरी स्कूलची दुकानदारी बंद ; शाळा येणार कायद्याच्या चौकटीत, अभ्यासक्रमाकडे लक्ष

केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता सर्वेक्षण सुरू असून शिक्षण संचालक (योजना) या विभागा मार्फत राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर अशैक्षणिक काम करण्याची वारंवार सक्ती केली जात आहे.संघटनेने  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सोबत बैठक घेऊन याबाबत विनंती केली आहे.तसेच या विभागाचे प्रमुख डॉ महेश पालकर यांनाही संघटनांनी भेट घेऊन निवेदन दिले आहे.शिक्षण हक्क कायदा 2009 नुसार 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे बंधनकारक आहे, असे असतानाही शिक्षकांवर शालाबाह्य कामे लादली जात आहेत.त्यामुळे सर्व संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेशी राज्यातील 23 प्राथमिक शिक्षक संघटना संलग्न असल्याची माहिती राज्याध्यक्ष केशवराव जाधव यांनी दिली आहे. तसेच पुणे शहर शाखेचे अध्यक्ष बाळकृष्ण चोरमले आणि विकास काटे यांनी मोर्चाची पूर्वतयारी पूर्ण झाल्याची माहीती दिली आहे.