शिक्षक भरतीवर शासनाची सावध भूमिका ; ती पदे सोडून करणार भरती? 

शिक्षक भरतीवर शासनाची सावध भूमिका ; ती पदे सोडून करणार भरती? 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेल्या काही दिवसांपासून शिक्षक भरतीबाबत (teacher recruitment) राज्यात सुरू असलेल्या वादावरून शासनाने सावध भूमिका घेत वेगळ्या  हालचाली सुरू केल्या आहेत. मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम वाद (Marathi medium and English medium debate) न्यायालयात जाऊन भरती रखडू नये म्हणून केंद्र शाळेवरील साधन व्यक्तीच्या जागा वगळून भरती राबवण्याचा शासन विचार करत असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

शासनाकडून राबविल्या जात असलेल्या वेगवेगळ्या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ होत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. शिक्षक भरतीबाबतही गोंधळ होऊ नये म्हणून शासनाने सर्व नियमावलींचे काटेकोरपणे पालन करत भरती प्रक्रिया राबविण्याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, मराठी माध्यमाचे शिक्षक विरुद्ध इंग्रजी माध्यमाचे शिक्षक असा वाद गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पेटला आहे. त्यात शिक्षक भरातीवर न्यायालयात याचिकाही प्रलंबित आहेत.शासनातर्फे केंद्र शाळांवर एक साधन व्यक्ती म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या शिक्षकाची निवड केली जाणार आहे. मात्र, त्यामुळे मराठी माध्यमाच्या शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने ही प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी शिक्षक भरती पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून केली जात आहे.

राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी शिक्षक भरतीसाठीची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली आहे. सुमारे 20  ते 22  हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.येत्या दोन दिवसात याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. मात्र केंद्र शाळांवरील साधन व्यक्ती निवडीवरून सर्व भरती प्रक्रिया रखडली जाऊ नये म्हणून शासनाकडून वेगवेगळ्या पातळीवर विचार केला जात आहे.त्यात साधन व्यक्ती पदाची भरती बाजूला ठेवून उर्वरित सर्व पदांवर भरती प्रक्रिया राबवण्याचा विचार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.