जगविख्यात लस निर्माते एकाच व्यासपीठावर ; WHO च्या सौम्या स्वामीनाथन यांची उपस्थिती 

प्रमुख वक्त्या म्हणून डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ.सौम्या स्वामीनाथन उपस्थित राहणार आहेत.

जगविख्यात लस निर्माते एकाच व्यासपीठावर ; WHO च्या सौम्या स्वामीनाथन यांची उपस्थिती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) बायोटेक्नॉलजी विभागातर्फे ‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे (International conference)आयोजन करण्यात आले आहे.येत्या २९ ते ३१ जानेवारी दरम्यान होणाऱ्या या परिषदेचे उद्धाटन सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख व उद्योजक डॉ.सायरस पूनावाला यांच्या हस्ते होणार असून यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ.सौम्या स्वामीनाथन (Scientist Dr. Soumya Swaminathan)उपस्थित राहणार आहेत.

 विद्यापीठाचा बायोटेक्नॉलजी विभाग, अमेरिकेतील रटगर्स स्कूल ऑफ बायोमेडिकल अँड हेल्थ सायन्सेस आणि रोझवेल पार्क कॉम्प्रिहेन्सिव्ह कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.‘बायोलॉजी बियॉन्ड बाऊंडरीज’ या परिषदेनिमित्त जगभरातील वैज्ञानिकांची मांदियाळी जमणार आहे.या प्रसंगी  विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ.  पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, बायोटेक्नॉलजी विभाग प्रमुख डॉ. स्मिता झिगांर्डे उपस्थित राहतील. 

माइटोकॉन्ड्रिया, सेल डेथ आणि मानवी रोग, मानवी रोग व्यवस्थापनातील संगणकीय यश आणि आरोग्यसेवेतील मूलभूत आणि वैद्यकीय संशोधन आणि परिवर्तन या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये अलीकडील प्रगती अधोरेखित करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगभरातून ५० हून अधिक शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. ज्यात प्रा. एड्रियन हिल (कोविशील्ड लस शोधक, ऑक्सफर्ड विद्यापीठ), डॉ. पॅट्रिक डफी (मलेरिया लस शोधक), डॉ. एलिझाबेथ उंगेर (प्रमुख, सीडीसी, यूएसए)  यांसारखे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ तर डॉ. रॉबर्ट सेडर (NIAAID, NIH, बेथेस्डा यूएसए), माईक मॅकक्यून (बिल गेट्स फाऊंडेशन) इत्यादी प्रतिष्ठित जागतिक आरोग्य संघटनेशी संबंधित मान्यवर या परिषदेत सार्वजनिक आरोग्याविषयी चर्चा करणार आहेत. ही परिषद विद्यापीठाच्या भूगर्भशास्त्र विभागात होणार आहे.