PUNE G20 : पाच लाख पुणेकर पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला देणार भेट :  राजेश पांडे

'तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती व त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे.

PUNE G20 : पाच लाख पुणेकर पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र प्रदर्शनाला देणार भेट :  राजेश पांडे

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

जी 20 परिषदेच्या (G20 ) निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव स्टेडियम (Savitribai Phule Pune Vidyapeethachy Khashaba Jadhav Stadium) मध्ये येत्या १७ ते २२ जून या कालावधीत 'पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र' या विषयावरील प्रदर्शनाचे (Foundational Literacy and Numerology Exhibition) आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला पाच लाख पुणेकर भेट देतील ,असे नियोजन केले असल्याची माहिती जी २० परिषद संयोजन समितीचे समन्वयक राजेश पांडे (Rajesh Pandey ) यांनी दिली.

हेही वाचा : G 20 Pune : जी २० परिषदेनिमित्त शैक्षणिक जागराला सुरूवात

पांडे म्हणाले, 'तीन ते नऊ वयोगटातील मुलांच्या शिक्षणाचा पाया मजबूत होण्यासाठी पायाभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र शिक्षण पद्धती व त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन शैक्षणिक साधनांचा या प्रदर्शनात समावेश असणार आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांचे कुतूहल जागृत करणारी साधने प्रदर्शनात पाहायला मिळतील. या साधनांमुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत आनंददायी कृतियुक्त शिक्षण देता येईल. ज्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा हातभार लागेल. त्यामुळे पुणेकरांनी ही संधी दवडू नये.

दरम्यान, पुणेकरांनी प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट द्यावी याचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, व्यवस्थापन समिती सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, डॉ. आदित्य अभ्यंकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रदर्शनाला अधिकाधिक पुणेकरांनी भेट द्यावी असे आवाहन पाटील यांनी या बैठकीत केले होते. त्याला सर्व शिक्षण संस्थांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शाळांतील सुमारे दीड लाख विद्यार्थी आणि शिक्षक प्रदर्शनाला भेट देणार आहेत.  पीएमपीएमएलने त्यासाठी विनामूल्य वाहन व्यवस्था केली आहे.