बीबीए/बीएमएस/बीसीएच्या प्रवेशापासून लाखो विद्यार्थी राहणार वंचित ? द्यावी लागणार सीईटी परीक्षा

प्रवेश परीक्षेविषयी जागृतीचा झाली नसल्याने त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेवर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बीबीए/बीएमएस/बीसीएच्या प्रवेशापासून लाखो विद्यार्थी राहणार वंचित ? द्यावी लागणार सीईटी परीक्षा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test cell ) यंदा प्रथमच बीबीए, बीएमएस,  बीसीए (BBA, BMS, BCA) या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी  सामायिक प्रवेश परीक्षा (CET) २७ ते २९ मे दरम्यान घेतली जाणार आहे. मात्र, या प्रवेश परीक्षेविषयी जागृतीचा झाली नसल्याने त्याचा फटका प्रवेश प्रक्रियेवर बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांकडून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. 

राज्यात बीबीए, बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांच्या एक लाखापेक्षा अधिक जागा आहेत. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) हे अभ्यासक्रम स्वत:च्या अखत्यारित घेतले. त्यामुळे या अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा मिळाला आहे. त्यामुळे अभ्यासक्रमांच्या मान्यतेसाठी एआयटीसीईची मान्यताही बंधनकारक करण्यात आली आहे. 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे बीबीए, बीएमएस,  बीसीए  या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरीय सीईटी घेतली जाणार आहे. विनासीईटी या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळणार नाही. यंदा प्रथमच होणाऱ्या या परीक्षेमुळे ग्रामीण भागात विद्यार्थी आणि पालकांमध्ये जागृती नसल्याचे दिसून येत आहे. या परीक्षेसाठी सीईटी सेलने नोंदणी अर्ज  ११ एप्रिलपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे. मात्र, असंख्य विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज भरलेला नाही. त्यामुळे असे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत ना ? अशी भिती निर्माण झाली आहे. 

आतापर्यंत या अभ्यासक्रमांचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर गुणवत्तेच्या आधारे होत होते. मात्र यंदापासून या अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीमार्फत होणार आहेत. त्यामुळे सीईटीला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद न मिळाल्यास त्याचा फटका प्रवेशांना बसू शकतो.