11th admission: अकरावी प्रवेशाचा दुसरा भाग भरा ८ जूनपासून

शनिवारी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग भरण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तसेच सध्या पहिल्या फेरीचे नियोजन केले जात आहे.

11th admission: अकरावी प्रवेशाचा दुसरा भाग भरा ८ जूनपासून

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची उत्सुकता त्यामुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील (11th online admission process) पुढील टप्पा केव्हा सुरू केला जाणार याबाबतचे वेळापत्रक शिक्षण विभागातर्फे (education department ) शनिवारी (दि.३) दुपारी जाहीर केले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना येत्या ८ जूनपासून अकरावी प्रवेश अर्जातील दुसरा भाग (11th admission preference form) भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

    राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक , अमरावती व नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयामधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे केले जाणार आहेत. शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत १ लाख ४६ हजार २४७ विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केले आहे.

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाईल, असे शिक्षण विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. परंतु ,अद्याप या संदर्भातील अधिकृत वेळापत्रक शिक्षण विभागाने जाहीर केले नाही. मात्र, याबाबत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता शनिवारी अकरावी प्रवेश प्रक्रियेचा दुसरा भाग भरण्यासंदर्भातील वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. तसेच सध्या पहिल्या फेरीचे नियोजन केले जात आहे.त्यानंतर पुढील दोन फेऱ्यांचे नियोजन घोषित केले जाईल, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

      इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाचे काय ? असा प्रश्न विद्यार्थी व पालकांसमोर उभा राहतो. इयत्ता अकरावीसाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने प्रवेश दिले जातात. अकरावी प्रवेश अर्जाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थी कोणत्या महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरतात यावर त्यांचा प्रवेश अवलंबून असतो. त्यामुळे अकरावी प्रवेश अर्जाचा दुसरा भरण्यास केव्हापासून सुरुवात होणार याविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये उत्सुकता आहे.