दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 12 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे शुल्कमाफीचे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कमाफीचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य शासनाने दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ (Exam fee waived for students from drought affected areas)करण्याचा निर्णय घेतला असून पुणे विभागीय शिक्षण मंडळाने याबाबतचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 12 एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांचे शुल्कमाफीचे प्रस्ताव सादर करता येणार आहेत.

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 28 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, बऱ्याच ठिकाणी नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे आणि शाळांना ऑनलाईन प्रस्ताव सादर करताना अडचणी आल्यामुळे मुदतवाढ द्यावी, अशी मागणी पुणे जिल्हा मुख्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली होती. याबाबतचे निवेदन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर व सचिव प्रसाद गायकवाड यांनी पुणे विभागीय शिक्षण मंडळाला दिले होते.

पुणे विभागीय शिक्षण मंडळाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना येत्या 12 एप्रिलपर्यंत प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी व प्राचार्यांनी तातडीने समक्ष संपर्क साधून बाधित क्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांची माहिती ऑनलाईन पद्धतीने राज्य मंडळ कार्यालयास 12 एप्रिलपर्यंत सादर होईल याबाबत काळजी घ्यावी,असे विभागीय मंडळाचे सचिव औदुंबर उकिर्डे यांनी स्पष्ट केले आहे.