कमवा व शिका मानधनवाढ; निर्णय झाला अंमलबजावणी कधी ? 

व्यवस्थापन परिषदेत कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.या घटनेस एक महिन्याचा कालावधी उलटून गेला, मात्र अद्याप निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.

कमवा व शिका मानधनवाढ; निर्णय झाला अंमलबजावणी कधी ? 

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) व्यवस्थापन परिषदेत कमवा व शिका योजनेच्या (Earn & Learn Scheme) मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.या घटनेस एक महिन्याचा कालावधी उलटून गेला, मात्र अद्याप निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना सुधारित दराने ५५ रुपये प्रती तास मानधन केव्हा मिळणार, असा सवाल अधिसभा सदस्य व विद्यार्थ्यांकडून (CNET member and student) उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजावे तसेच आर्थिक दूर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी स्वकष्टातून काही रक्कम मिळावी, या उद्देशाने पुणे विद्यापीठातर्फे कमवा व शिका योजना राबवली जाते. विद्यापीठातील विभागामधील विद्यार्थी व संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासाठी ही योजना राबवली जाते.परंतु, विद्यार्थ्यांना प्रती तास ४५ रुपये मानधन दिले जात असल्याने त्यात वाढ करावी, अशी मागणी विविध विद्यार्थी संघटना व अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली. त्यास विद्यापीठाने मान्यता देत कमवा व शिका योजनेचे मानधन प्रती तास ५५ रुपये केले.मात्र, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

हेही वाचा : SPPU News : विद्यापीठातील विद्यार्थी किती दिवस उपाशी राहणार?

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत कमवा व शिका योजनेच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीच्या इतिवृत्तावर अद्याप स्वाक्षऱ्या झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातर्फे मानधन वाढीचे पत्र प्रसिध्द करण्यात आले नाही. परिणामी वाढीव मानधनाची अंमलबजावणी होऊ शकली नाही,असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

--------------------------------------------

"विद्यार्थी हिताच्या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होणे गरजेचे आहे. लालफितीच्या कारभारात चांगले निर्णय अडकून ठेवू नये. पुढील महिन्यांपासून विद्यार्थ्यांना नवीन दराने मानधन द्यावे.विद्यापीठाने पूर्वेलक्षी  प्रभावाने मानधन देण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर आणू नये." 

दादाभाऊ शिनलकर , आधिसभा सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

------------

"विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या मानधन वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकर करावी.कमवा व शिका योजनेत अधिकाधिक विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे.तसेच विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या कामाच्या स्वरूपात सुधारणा करावी.विद्यार्थ्यांना वाढीव मानधन देण्यास विलंब करणे हे विद्यापीठाला शोभणारे नाही." 
 संतोष ढोरे , माजी अधिसंभा सदस्य , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 
------------------------