नॅक मुल्यांकनासाठी विभागीय समित्या; शिक्षण सहसंचालकांकडे मोठी जबाबदारी

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरूवारी (दि. १६) याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यापुर्वी स्थापन कऱण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये आणखी तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

नॅक मुल्यांकनासाठी विभागीय समित्या; शिक्षण सहसंचालकांकडे मोठी जबाबदारी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) परमार्श योजनेच्या धर्तीवर राज्यातील नॅक (NAAC) /एनबीए (NBA) मुल्यांकन न झालेल्या महाविद्यालयांचे मुल्यांकन होण्यासाठी परीस-स्पर्श (Paris Sparsh) ही योजना राबविली जात आहे. त्यासाठी यापूर्वीच राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय व जिल्हा स्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आता उच्च व तंत्र विभागाकडून (Higher and Technical Department) विभागीय स्तरीय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यानुसार तंत्र शिक्षण विभागाचे विभागीय शिक्षण सहसंचालक हे या समितीचे अध्यक्ष असतील.

 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने गुरूवारी (दि. १६) याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यापुर्वी स्थापन कऱण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये आणखी तीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन (एनबीए) यांचा एक प्रतिनिधी, मुंबईतील वीरमाता जीजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापक डॉ. आर. एन. आवळे आणि पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल यांचा समावेश आहे.

‘आयआयटी’मध्ये मुलींची संख्या वाढली; देशातील २३ संस्थांमध्ये ३ हजार ४२२ मुली

 

विभागीय स्तरीय समितीमध्ये संबंधित विभागाचे सहसंचालक अध्यक्ष असतील. तर विभागीय सहसंचालकांनी नामनिर्देशित केलेले विभागातील ५० टक्के पेक्षा अधिक अभ्यासक्रमांचे एनबीए मुल्यांकन असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन प्राचार्य आणि दोन मानांकनासंदर्भातील तज्ज्ञ यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. त्याचप्रमाणेच संबंधित महाविद्यालायांतील सहसंचालकांनी नामनिर्देशित केलेले एक आयक्युएसी समन्वयक यांनाही समितीत स्थान देण्यात आले आहे.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठासाठीही स्वतंत्र विद्यापीठ स्तरीय समितीही स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरु समितीचे अध्यक्ष असतील. तंत्र शिक्षणचे सर्व विभागीय सहसंचालक, कुलगुरुंनी नामनिर्देशित केलेला शासकीय, अनुदानित संस्थांमधील एनबीए मानांकनांसदर्भातील एक तज्ज्ञ, विनानुदानित संस्थेतील एक तज्ज्ञ, ए ग्रेड नॅक मुल्यांकन असलेल्या शासकीय किंवा अनुदानित व विनानुदानित संस्थेतील प्रत्येकी एक आयक्युएसी समन्वय समितीचे सदस्य असतील. तर विद्यापीठाचे आयक्युएसीचे संचालक समितीचे सदस्य सचिव असणार आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO