पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शाळांना सुट्टी देण्याची मागणी

सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्यातील मध्यवर्ती भागातील काही रस्ते बंद केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्षा चालक व स्कूल बस चालकांना आणि पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडणे अडचणीचे होऊ शकते.

पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शाळांना सुट्टी देण्याची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात विविध कार्यक्रमानिमित्त येणार आहेत.त्यांचे सर्व कार्यक्रम पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असून सकाळच्या सत्रात या परिसरात अनेक शाळा व महाविद्यालय (school and colleges )सुरू असतात. तसेच पुणे हवामान विभागाने पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जाहीर केले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी (trafic jam) आणि सुरक्षेच्या (security) दृष्टीने १ ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे राज्याच्या शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे.
    शहरातील मध्यवर्ती भागातील विविध पेठांमध्ये असणाऱ्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना सकाळी रिक्षा किंवा स्कूल बसने प्रवास करून शाळेत पोहोचावे लागते. पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पुणेकरांना वाहतूक कोंडीचा अधिकच सामना करावा लागत आहे. येत्या एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. याच दिवशी पंतप्रधान काही कार्यक्रमानिमित्ताने पुण्यात येणार आहेत.त्यामुळे वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. 
-----------
"सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून येत्या १ ऑगस्ट रोजी या भागातील काही रस्ते बंद केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे रिक्षा चालक व स्कूल बस चालकांना आणि पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडणे अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे सर्व मंडळाच्या शाळांना सुट्टी द्यावी, या मागणीचे निवेदन राज्याच्या शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे."
- प्रशांत कनोजिया, संघटक, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना 
---------------
''येत्या १ ऑगस्ट रोजी पुण्यात सुरक्षेच्या कारणास्तव अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. परिणामी वाहतूक कोंडी होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलीला स्वतः शाळेत सोडवा. मी रिक्षा बंद ठेवणार आहे, असे मला माझ्या मुलांना दररोज हुजुरपागा शाळेत सोडणाऱ्या रिक्षावाल्या काकांनी सांगितले. त्यामुळे मी स्वतः मुलींना शाळेत सोडण्यासाठी जाणार आहे.'' 
- निलेश मारणे,पालक,