नवप्राध्यापकांचे आता उपोषणास्त्र; उच्च शिक्षण विभागाला दिला इशारा

महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

नवप्राध्यापकांचे आता उपोषणास्त्र; उच्च शिक्षण विभागाला दिला इशारा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरूवारी (दि. १६) उच्च शिक्षण संचालनालयाच्या (Higher Education Department) कार्यालयासमोर एकदिवशी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास दि. १५ जानेवारीपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. 

 

संघटनेकडून उच्च शिक्षण विभागाकडे अनेक महत्वपूर्ण मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये दि. १ ऑक्टोबर २०१७ च्या आकृतीबंधाला मंजुरी देऊन शंभर टक्के सहायक प्राध्यापक, ग्रंथालय पदभरतीला परवानगी देणे, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना प्रति तास दीड हजार रुपये मानधन द्यावे. तासिका तत्त्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा. सहायक प्राध्यापक पदभरतीचे नाहरकत प्रमाणपत्र उच्च शिक्षण सहसंचालक स्तरावर देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे.

नॅक मुल्यांकनासाठी विभागीय समित्या; शिक्षण सहसंचालकांकडे मोठी जबाबदारी

 

त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील २४ नोव्हेंबर २००१ पासूनचे कायम विनानुदानित, विनानुदानित तत्वावर परवानगी देण्यात आलेल्या महाविद्यालयांना व तुकड्यांना त्वरित अनुदान देण्यात यावे, अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती वरील बंदी तात्काळ उठवून त्वरित भरती करावी, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचे किमान एक शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे आणि औरंगाबाद जिल्ह्यात एक अकृषी केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्याचा प्रस्ताव तात्काळी केंद्र सरकारकडे पाठवावा, या मागण्यांचाही समावेश आहे.

 

या मागण्यांसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी उच्च शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांबाबत ठोस कृती न झाल्यास भविष्यात परत लाक्षणिक उपोषण करून १५ जानेवारी २०२४ पासून संघटनेच्या वतीने पात्रता धारकांच्या हितासाठी बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी दिला आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO