राज्यातील शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्या जाहीर करा; राज ठाकरेंची सरकारकडे मागणी 

सध्या आचारसंहिता असली तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्या जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे. 

राज्यातील शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्या जाहीर करा; राज ठाकरेंची सरकारकडे मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

गेले काही दिवस मुंबई, ठाणे, पालघर आणि संपुर्ण कोकणात दिवसाचे सरासरी तापमान ४०  अंशापर्यंत (Heat wave in Maharashtra) गेलं आहे. उर्वरित महाराष्ट्रात देखील काही वेगळी परिस्थिती नाही. अशा परिस्थितीत लहान मुलांना तापमानाचा अधिक फटका बसू शकतो. त्यामुळे सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्या (summer holidays in schools) जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारकडे केली आहे. 

महाराष्ट्राचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान व उकाड्याने जनता हैराण झाली आहे. उकाड्याने अंगाची लाही लाही होत असतानाच आता राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील वाढती उष्णता पाहून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील शाळांना आताच उन्हाळी सुट्टी जाहीर करा, असे सरकारला आवाहन केले आहे. 

उन्हाळा अजून खूप शिल्लक आहे. अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी, असे त्यांनी सरकारला लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.