कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट युजी आणि पीजीचे गुण एका वर्षासाठी वैध; विद्यार्थ्यांना दिलासा

ज्या विद्यापीठांना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनाही मे-जूनमध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या आधारे प्रवेश देता येणार आहे.

कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट युजी आणि पीजीचे गुण एका वर्षासाठी वैध; विद्यार्थ्यांना दिलासा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) नुकतीच सार्वजनिक नोटीस जारी करून वर्षातून पदवी अभ्यासक्रमात दोनदा प्रवेशाची (Two Time Admission) परवानगी दिली आहे. आता या संदर्भात UGC ने विद्यार्थ्यांसाठी आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट CUET UG  आणि CUET PG  चे गुण एका वर्षासाठी वैध असणार आहेत.   

मे-जूनमध्ये CUET प्रवेश परीक्षेनंतर जुलै-ऑगस्टमध्ये प्रवेश घेतले जातात. यूजीसीच्या नव्या नियमानंतर ज्या विद्यापीठांना जानेवारी-फेब्रुवारीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनाही मे-जूनमध्ये झालेल्या प्रवेश परीक्षेच्या निकालाच्या आधारे प्रवेश देता येणार आहे. म्हणजेच CUET UG आणि CUET PG चे गुण जे जुलै-ऑगस्टच्या प्रवेशासाठी वैध होते, त्याच स्कोअरच्या आधारे जानेवारी-फेब्रुवारीमध्येही प्रवेश घेता येणार आहे. 

UGC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, " भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये (Indian Universities and Colleges) नवीन शैक्षणिक सत्र जुलै-ऑगस्टमध्ये सुरू होते आणि मे-जूनमध्ये संपते. वर्षातून दोनदा प्रवेश घेणाऱ्यांसाठी, जर उच्च शिक्षण संस्थेने पहिल्या प्रवेश चक्रात CUET व्यतिरिक्त प्रवेश परीक्षा किंवा बोर्ड परीक्षेचा निकाल ग्राह्य धरला असेल तर तोच निकाल दुसऱ्या प्रवेश चक्रातही ग्राह्य धरला जावा.

आता यूजीसीच्या या नियमाचा फायदा अशा विद्यार्थ्यांना होणार आहे जे जुलै-ऑगस्टमध्ये काही कारणांमुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत किंवा ज्यांचे नाव प्रवेश यादीत येऊ शकले नाही. अशा विद्यार्थ्यांना वर्षभर वाट पाहावी लागणार नाही आणि त्याच जुन्या स्कोअरवर ते जानेवारी-फेब्रुवारीसाठी अर्ज करू शकतील.

दरम्यान, दुहेरी प्रवेशासाठी विद्यापीठाला आपला आराखडा अतिशय काळजीपूर्वक तयार करावा लागेल. इन्फ्रास्ट्रक्चर, फॅकल्टी आणि सपोर्ट सिस्टीम याकडे पाहावे लागेल. त्यानंतर दोनदा प्रवेश घ्यावा लागेल. संस्था हे सूत्र प्रथम पीएचडीमध्ये, नंतर पीजीमध्ये आणि पूर्ण तयारीनंतर यूजी अभ्यासक्रमांमध्ये स्वीकारू शकतात, असे ही UGC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.