UGC-NET पेपर फुटीचा तपास CBI कडे 

गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरकडून मिळालेल्या माहितीवरून परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आले.

UGC-NET पेपर फुटीचा तपास CBI कडे 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET नंतर आता UGC-NET परीक्षेतील गैरप्रकारांबाबत खुलासा झाल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता हे प्रकरण CBI कडे सोपवण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण मंत्रालयाचे सहसचिव गोविंद जैस्वाल (Govind Jaiswal, Joint Secretary, Ministry of Education)यांनी दिली आहे. 

 गोविंद जैस्वाल म्हणाले. "NTA ने 18 जून रोजी घेतलेल्या UGC-NET परीक्षेला 9 लाख विद्यार्थी बसले होते. परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने परीक्षा पुढे ढकललिई आहे. मंत्रालय परीक्षा आयोजित करण्याची पुढील तारीख लवकरच जाहीर करेल. सध्या हे प्रकरण सीबीआयकडे पाठवले आहे."

दरम्यान 18 जून रोजी ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. मात्र गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरकडून मिळालेल्या माहितीवरून परीक्षेत अनियमितता झाल्याचे समोर आले. तसेच पेपरफुटीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) 18 जून 2024 रोजी देशातील विविध शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये OMR (पेन आणि पेपर) मोडमध्ये UGC NET परीक्षा 2024 देखील आयोजित केली होती.  ही परीक्षा देशभरातील 317 शहरांमधील 1205 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. यामध्ये 9 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची पात्रता यूजीसी-नेट परीक्षेद्वारे निश्चित केली जाते. यावेळी या परीक्षेद्वारे पीएचडीला प्रवेश देण्याचा निर्णय यूजीसीने घेतला होता.