केंद्राच्या कोचिंग नियमावली विरोधात कोचिंग क्लासचालक आक्रमक; 28 जानेवारीला नाशिकमध्ये बैठक 

नाशिक येथे येत्या 28 जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे,

केंद्राच्या कोचिंग नियमावली विरोधात कोचिंग क्लासचालक आक्रमक; 28 जानेवारीला नाशिकमध्ये बैठक 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्र शासनातर्फे कोचिंग क्लासचालकासंदर्भात नुकतीच एक नियमावली (Coaching Class Manual) प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात 16 वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लास मध्ये शिक्षण देऊ नये, असे म्हटले आहे. परंतु,हा नियम न्यायाला धरून नाही. केवळ कोचिंग क्लास (coaching class) चालकांसाठीच नाही तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या धोकादायक आहे. त्यामुळे याबाबत कोचिंग क्लास चालकांकडून आंदोलन उभे केले जाणार आहे. त्यासाठी नाशिक येथे येत्या 28 जानेवारीला आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे, असे कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष बंडोपंत भुयार (Bandopant Bhuyar, Founder President of Coaching Classes Teachers Federation) यांनी सांगितले.

 कोचिंग क्लास मुळे वाढणाऱ्या आत्महत्या आणि काही ठिकाणी घडलेल्या आगीच्या घटना लक्षात घेऊन केंद्रशासनाने कोचिंग क्लास बाबत नियमावली प्रसिद्ध केली. या नियमावलीनुसार सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास मध्ये नोंदणी करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र देशभरातील 70 टक्के अनुदान अधिक कोचिंग क्लास मध्ये १६ वर्षाखालील मुले शिक्षण घेतात. हे कोचिंग क्लास बंद झाले तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहेच शिवाय कोचिंग क्लास चालकांची आर्थिक घडी बिघडणार आहे, अशी भूमिका कोचिंग क्लास संस्थाचालकांकडून व्यक्त केले जात आहे.त्यामुळे नियमालीच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा आणि आंदोलन उभे करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याबाबत 'एज्युवार्ता'शी बोलताना बंडोपंत भुयार म्हणाले, केंद्र शासनाने निश्चितच नियमावली तयार करावी या नियमावली बाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. परंतु १६ वर्षाखालील मुलांना कोचिंग क्लास मध्ये प्रवेश दिला नाही तर त्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. या वयातच त्यांचा पाया मजबूत होतो. असरने दिलेल्या अहवालामध्ये सुद्धा इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांना दुसरीतील गणिते व पुस्तकातील पॅरेग्राफ वाचता येत नसल्याचे नुकतेच समोर आले आहे. कोरोना काळामध्ये मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यात अशा पद्धतीच्या नियमावलीमुळे विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत होतील.

हेही वाचा : एज्युवार्ता स्पेशल न्यूज: राम लल्ला मूर्ती निर्मितीमध्ये पुण्यातील या दिग्गजांचा सहभाग

युवकांनी स्वयंरोजगार करून स्वतःच्या पायावर उभे राहावे, अशी शासनाची अपेक्षा आहे.त्यानुसार अनेकांनी स्वतःच्या बुद्धीच्या बळावर कोचिंग क्लास सारखे स्वयंरोजगार उभे केले आहेत. सोळा वर्षाखालील मुलांना प्रवेश दिला नाही तर हे कोचिंग क्लासेस बंद पडतील. अनेक पालक मुलांना कोचिंग क्लास मध्ये पाठवतात शाळेमध्ये ज्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत.त्याची तयारी कोचिंग क्लासमध्ये करून घेतली जाते. त्यामुळे शासनाने आपल्या नियमात सुधारणा करावी, यासाठी आंदोलन उभे केले जाणार आहे. त्याची दिशा ठरविण्यासाठीच नाशिक येथे क्लास चालकांची बैठक घेतली जाईल, असेही भुयार यांनी सांगितले.