एज्युवार्ता स्पेशल न्यूज: राम लल्ला मूर्ती निर्मितीमध्ये पुण्यातील या दिग्गजांचा सहभाग

बाळ रामाचा चेहरा निरागस असावा, डोळे रामरक्षेतील वर्णनाप्रमाणे राजीव असावेत.

एज्युवार्ता स्पेशल न्यूज: राम लल्ला मूर्ती निर्मितीमध्ये पुण्यातील या दिग्गजांचा सहभाग

(राहुल शिंदे)

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयोध्या (ayodhya) येथे उभारण्यात आलेल्या भव्य दिव्य राम मंदिरामध्ये (Ram mandir) प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापणेला अवघे काही तास उरले आहेत. परंतु, ही मूर्ती कशी असावी, त्यासाठी कोणता दगड वापरला जावा,यासाठी पुण्यातील शिक्षण क्षेत्रातील दिग्गजांनीही सहभाग घेतला होता. त्यानुसार या मूर्तीचे रेखाचित्र रेखाटून शिल्पकारंकडून प्रभू श्री राम लल्लाची मूर्ती तयार करून घेण्यात आली आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती व मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो.बं.देगलूरकर Former Chancellor of Deccan College University and Practitioner of Sculpture Dr. G. B. Deglaurka यांनी मूर्ती कशी असावी याबद्दल अयोध्येत झालेल्या चर्चेत सहभाग घेतला होता.त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे (Savitribai Phule Pune University) माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर (Dr.nitin karmalkar) यांनी मूर्तीसाठी कोणता दगड वापरावा, याबद्दल सल्ला दिला होता.

अयोध्येतील राम मंदिरात कोणती मूर्ती असावी,याबद्दल चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यासाठी कोणता दगड वापरावा याबद्दलही तज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली होती. गेल्या वर्षी 3 जानेवारी रोजी अयोध्या तीर्थस्थान न्यासाच्या मंडळींनी चर्चा घडवून आणली होती. या चर्चेत गो. बं. देगलूरकर यांनी सहभाग घेतला.

'एज्यूवार्ता' याबद्दल माहिती देताना देगलूरकर म्हणाले, प्रभू श्री रामाच्या जन्मस्थानी बाळ रामाची मूर्ती असावी. बाळ रामाच्या हातात धनुष्यबाण असावा. पाठीवर भाता असू नये, कारण बाळ राम युद्धाला किंवा शिकारीला जात नाही. बाळ रामाचा चेहरा निरागस असावा, डोळे रामरक्षेतील वर्णनाप्रमाणे राजीव असावेत. ही मूर्ती पाच ते सहा वर्षाच्या बाळ रामाची असावी, असे ठरले. त्यानंतर जगविख्यात चित्रकार वासुदेव कामात यांनी रेखाचित्र करावे आणि शिल्पकारांची निवड करून ही मूर्ती तयार करावी. त्यासाठी न्यासाने शिल्पकारांची निवड करावी.

देगलूरकर म्हणाले, बाळ रामाच्या मूर्तीसाठी कोणत्या प्रकारची शीला वापरावी, याबद्दलही चर्चा करून निर्णय घेण्यात आला. संगमरवरी दगड असू नये, कारण तो ठिसूळ असतो.कालांतराने तो पिवळा पडतो. त्यामुळे मूर्तीचे केस आणि डोळे यांना रंग द्यावे लागतात. म्हणून ती पाषाणात तयार करावी.नेपाळहून आणलेल्या दगडापेक्षा कर्नाटकातील दगड चांगला असून मूर्ती तयार करण्यास सोपा असल्याने कर्नाटकातील दगड वापरण्यात आला. त्यातून राम लल्लाची छान निरागस राजीव मूर्ती तयार करण्यात आली.

अयोध्येत प्राण प्रतिष्ठापना केली जाणारी राम लल्लाची मूर्ती ही केवळ बाळ रामाची स्थानक मूर्ती आहे. बाळ राम असल्यामुळे तेथे सीता असणार नाही. ही मूर्ती गर्भ गृहामध्ये स्थापन होणार आहे ती हलवता येणार नाही. त्यामुळे त्याला अचल (ध्रुवबेर) मूर्ती म्हणता येईल, असेही देगलूरकर यांनी सांगितले.

दरम्यान, मूर्तीसाठी कोणता दगड वापरावा याबाबत झालेल्या ऑनलाइन चर्चेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.नितीन करमाळकर यांनी सहभाग घेतला होता.तसेच त्यांनी कर्नाटकातील दगड वापरावा, असे सुचवले होते.