CUET UG 2024:  फक्त 'या' विषयांच्या परीक्षा होणार ऑफलाइन 

ज्या विषयांमध्ये 1.5 लाखांहून अधिक अर्ज आहेत, त्यामध्ये OMR आधारित बहुविध पर्यायाचा अवलंब केला जाईल आणि परीक्षा पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल.

CUET UG 2024:  फक्त 'या' विषयांच्या परीक्षा होणार ऑफलाइन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपूर्वीच कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट (CUET) UG 2024 परीक्षा हायब्रीड मोड (Exam hybrid mode) मध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या बाबत आणखीन एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या विषयांमध्ये दीड लाखांहून अधिक अर्ज आहेत, त्यामध्ये ओएमआर आधारित बहुविध पर्यायाचा अवलंब (Adoption of multiple choice) केला जाईल आणि परीक्षा पेन-पेपर पद्धतीने (Examination Pen-Paper Method) घेतली जाईल. (CUET- UG) देखील प्रथमच पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल.

या आठवड्यात होणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) सल्लागार समितीच्या बैठकीत परीक्षेशी संबंधित अनेक नवीन प्रमुख निर्णयांना मंजुरी दिली जाईल. त्या पैकीच एक महत्वाचा निर्णय म्हणजे ज्या विषयांमध्ये 1.5 लाखांहून अधिक अर्ज आहेत, त्यामध्ये ओएमआर आधारित बहुविध पर्यायाचा अवलंब केला जाईल आणि परीक्षा पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल,अशी माहिती मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे.

दीड लाखापर्यंत अर्ज असलेल्या विषयांमध्ये संगणक आधारित चाचणी (CBT) असेल. अशाप्रकारे, बहुतेक विषयांच्या परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतल्या जातील आणि सामान्यीकरण प्रक्रियेचा अवलंब करावा लागणार नाही. यामुळे त्या विषयाचे सर्व विद्यार्थी एकाच शिफ्टमध्ये पेपर देऊ शकतील. CUET UG परीक्षा 2022 मध्ये सुरू झाली आणि गेल्या दोन वर्षांचा कल बघितला तर गणित, भौतिकशास्त्र, इंग्रजी, रसायनशास्त्र, वाणिज्य यासह अनेक विषयांमध्ये दीड लाखांहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रत्येक विषयाची परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आयोजित करावी लागते. नंतर निकालाच्या वेळी सामान्यीकरणाची प्रक्रिया होते. कारण वेगवेगळ्या शिफ्टमध्ये प्रश्नांची कठीण्य पातळी वेगळी असते. जेव्हा परीक्षा पेन-पेपर पद्धतीने घेतली जाईल, तेव्हा परीक्षा एकाच शिफ्टमध्ये घेतली जाईल आणि त्यामुळे कोणतीही सामान्यीकरण प्रक्रिया होणार नाही.

वैद्यकीय परीक्षेत NEET-UG मध्ये 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा एका दिवसात पेन-पेपर पद्धतीने घेतली जाते, तीच प्रक्रिया CUET-UG मध्येही घेतली जाईल. यामुळे झारखंड, काश्मीर, ईशान्येकडील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या सर्व बदलांबाबत अंतिम निर्णय सल्लागार समिती घेणार आहे. CUET परीक्षा 15 मे ते 31 मे या कालावधीत होणार आहे.  2024 मध्ये विद्यार्थ्यांना 6 विषय निवडण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. 2022 मध्ये विद्यार्थ्यांना 9 विषयांसाठी परीक्षा देण्याचा पर्याय देण्यात आला होता आणि मागच्या वर्षी  2023 मध्ये 10 विषयांचा पर्याय देण्यात आला होता.