बार्टीची पीएचडी फेलोशिप बंद; भुजबळांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

बार्टी या संस्थेद्वारे पीएचडी आणि एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. २०१३ पासून सुरू असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करण्यापासून वंचित राहणार आहेत, असे भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे.

बार्टीची पीएचडी फेलोशिप बंद; भुजबळांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
CM Eknath Shinde, Chhagan Bhujbal

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (Barti) वतीने पीएचडीसाठी देण्यात येणारी फेलोशिप बंद करण्यात आल्याचा दावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. तसे पत्र भुजबळ यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. (Barti Fellowship News)

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

बार्टी या संस्थेद्वारे पीएचडी आणि एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. २०१३ पासून सुरू असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करण्यापासून वंचित राहणार आहेत. हे विद्यार्थी ग्रामीण आणि दुर्गम भागातून प्रचंड कष्ट करून आणि आपली गुणवत्ता सिद्ध करून या पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहेत. ही फेलोशिप न मिळाल्यामुळे त्यांच्या भवितव्यावर परिणाम होईल. त्यामुळे बार्टी अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : विद्यार्थी अडवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा ; काय आहे कारण

फेलोशिप थांबवल्यामुळे विद्यार्थी तसेच बहुजन समाजात संतापाचे वातावरण आहे. इतर योजनांच्या निधीमध्येही कपात करण्यात आली आहे. या विरोधात संशोधक विद्यार्थी ५० दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. मात्र शासनाने याबद्दल कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.

फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मुलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करून पीएचडी शिक्षणापर्यंत पोहचले आहेत. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची घरातील पहिली शिक्षण घेणारी पिढी आहे. भूमिहीन, शेतमजूर, कष्टकरी, वीटभट्टी, घरकाम करणाऱ्यांची ही मुले आज आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. पण जर फेलोशिपच बंद झाली तरी या मुलांच्या भवितव्याचे काय होणार हा प्रश्न आहे. त्यामुळे बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.