नापास झाल्यामुळे 48 तासात 7 विद्यार्थ्यांची आत्महत्या ; अपयशामुळे संपवले जीवन

तेलंगणात गेल्या 48 तासात बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

नापास झाल्यामुळे 48 तासात 7 विद्यार्थ्यांची आत्महत्या ; अपयशामुळे संपवले जीवन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पालकांच्या मुलांकडून वाढत्या अपेक्षा, परीक्षेत आलेले अपयश, अपेक्षाभंग यामुळे विद्यार्थी आत्महत्यांचे (Student suicide)प्रमाण वाढत आहे. सध्या देशातील सर्व राज्यांमध्ये बोर्डांच्या परीक्षांचे निकाल जाहीर होत आहेत. अशा परिस्थितीत तेलंगणा (Telangana)राज्यातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. तेलंगणात गेल्या 48 तासात बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यामुळे 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली (7 students committed suicide)आहे.

तेलंगणा बोर्ड ऑफ इंटरमिजिएट परीक्षेने 24 एप्रिल रोजी प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाचे निकाल जाहीर केले होते. महबूाबाद परिसरात परीक्षेत नापास झाल्यामुळे दोन मुलींनी आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यातील एका गावात एका विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून घेतला आणि दुसऱ्याने विहिरीत उडी घेतली.
परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याने सुलतानबाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्या केली.तर शहरातील नल्लाकुंटा भागातील रहिवासी असलेला आणखी एक मुलगा जडचेर्ला येथील रेल्वे रुळाजवळ मृतावस्थेत आढळून आला.

परीक्षेतील खराब कामगिरी हे विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मंचेरियल जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्यांना परीक्षेत नापास झाल्यामुळे तीन इंटरमिजिएट प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.