कृषी महाविद्यालयातील 19 विद्यार्थी परदेशात घेणार अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण

विद्यार्थ्यांमध्ये धुळे कृषी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी, कृषी महाविद्यालय पुण्याचे आठ विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील दोन विद्यार्थी व पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरीच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कृषी महाविद्यालयातील 19 विद्यार्थी परदेशात घेणार अत्याधुनिक शेतीचे प्रशिक्षण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या (Mahatma Phule Agriculture University) कार्यक्षेत्रातील विविध कृषी महाविद्यालयातील 19 विद्यार्थी बँकॉक (Bangkok) येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Asian Institute of Technology) येथे प्रशिक्षणासाठीजाणार आहेत. जवळपास एक महिन्यांच्या प्रशिक्षणात हे विद्यार्थी काटेकोर शेतीसाठी गुगल अर्थ इंजिन, आयओटी आणि ड्रोन तंत्रज्ञान याचा अभ्यास करणार आहेत.

 

 

कास्ट प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी विद्यापीठाने हा उपक्रम हाती घेतला आहे. 19 विद्यार्थ्यांमध्ये धुळे कृषी महाविद्यालयाचे दोन विद्यार्थी, कृषी महाविद्यालय पुण्याचे आठ विद्यार्थी, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथील दोन विद्यार्थी व पदव्युत्तर महाविद्यालय, राहुरीच्या सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी दि. १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या दरम्यान आहे. या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

‘इस्रो’ची नोकरी नको रे बाबा; उच्चशिक्षित तरुणांची पाठ, काय आहे नेमकं कारण?

 

हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र, विद्यापीठात सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाकरिता विद्यापीठात कार्यान्वित असलेले प्राध्यापकवर्ग तसेच शिक्षण घेत असलेले पदव्युत्तर व आचार्य पदवी विद्यार्थ्यांच्या हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यासाठी प्रशिक्षण, कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, व्याख्याने इ. चे विविध विषयांवर वेळोवेळी आयोजन करण्यात येत आहेत. तसेच या प्रकल्पांतर्गत ड्रोन, रोबोट, आय ओ टी, कृत्रिम बुध्दीमत्ता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सींग, अर्थ इंजिन इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयावरील संशोधनाकरीता केला जात आहे.

 

 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या परदेश दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी परदेशी प्रशिक्षण घेण्यासाठी रवाना होणा-या विद्यार्थ्यासोबत बोलताना डॉ. पाटील म्हणाले कि, पदव्यूत्तर विद्यार्थ्यांना परदेशी प्रशिक्षणाची संधी देण्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रात अग्रेसर आहे. दस-याच्या सीमोल्लंघन पर्वात विद्यार्थी परदेशी प्रशिक्षण घेत आहेत ही विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे.

 

 

अशी संधी अधिकाधीक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात विद्यापीठाचे संशोधन संचालक व हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार नेहमीच प्रयत्नशील आहेत, असे कुलगुरू म्हणाले. याप्रसंगी कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनिल मासाळकर, प्राध्यापक वर्ग, प्रशिक्षण घेण्यासाठी जाणारे पदव्युत्तर विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. प्रवीण खराडे यांनी केले.