लॉटरीशिवाय मिळणार आरटीईतून प्रवेश? काय आहे कारण...

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीस ते तीस हजार जागांसाठी सुमारे 500 ते 700 अर्ज आल्याचे दिसून येत आहे.

लॉटरीशिवाय मिळणार आरटीईतून प्रवेश? काय आहे कारण...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) राबविल्या जात असलेल्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी (RTE Admission Process)पालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे.त्यामुळे अनेक शाळांमध्ये उपलब्ध असणाऱ्या जागांच्या तुलनेत कमी अर्ज येण्याची शक्यता आहे. तर काही शाळांसाठी एकही अर्ज येणार नाही.परिणामी या शाळांमधील प्रवेशासाठी लॉटरी काढण्याची आवश्यकता (Lottery requirement for rte) admissionभासणार नाही. त्यामुळे यंदा बहुतांश शाळांची आटीई प्रवेश प्रक्रिया लॉटरी शिवाय पूर्ण होऊ शकते. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वीस ते तीस हजार जागांसाठी सुमारे 500 ते 700 अर्ज आल्याचे दिसून येत आहे.

शालेय शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रियेच्या नियमावलीमध्ये बदल करण्यात आला. प्रथमतः सरकारी ,अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश दिला जाईल. जर या शाळा विद्यार्थ्यांच्या घराजवळ उपलब्ध नसतील तरच संबंधित विद्यार्थ्याला स्वयंअर्थसहाय्यीत शाळेमध्ये प्रवेश देण्यात येईल, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे आरटीई प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांना एकही इंग्रजी माध्यमाची शाळा प्रवेशासाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच आठ लाखाहून अधिक जागा उपलब्ध असताना आत्तापर्यंत केवळ 46 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.

हेही वाचा : आरटीईच्या 6000 जागांसाठी 7 तर 12000 जागांसाठी 80 अर्ज ; 15 जिल्ह्यात अर्जांची संख्या 500 च्या आत

आरटीई प्रवेशासाठी मागील वर्षापर्यंत केवळ इंग्रजी माध्यमाच्या शाळा उपलब्ध होत्या. त्यावेळी सुमारे एक लाख दहा हजार जागांसाठी तीन ते चार पट अर्ज येत होते. या जागांवर सुमारे 80 ते 90 हजार विद्यार्थी प्रवेश घेत होते. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्रवेशद्वार शिक्षण विभागाने बदललेल्या नियमावलीमुळे पूर्णपणे बंद झाले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालकांना पूर्ण शुल्क भरावे लागणार आहे. सध्या केवळ 46 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांमध्येच प्रवेश दिले जाणार आहेत. परिणामी यंदा एकही विद्यार्थी आरटीई अंतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊ शकणार नाही.

कोणतीही शासकीय योजना अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने राबवले जाते. मात्र आरटीई अंतर्गत घातलेल्या निर्बंधामुळे कमीत कमी विद्यार्थी आरटीई चा लाभ कसे घेतील, याबाबतचा विचार केल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी 80 ते 90 हजार विद्यार्थी शाळेत प्रवेश घेत होते. परंतु, ही संख्या यावर्षी 50 हजारापर्यंत पोहोचेल की नाही याबाबतही शंका आहे. त्यामुळे शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.