आरटीई प्रवेशासाठी दिवस उरले आठ ; केवळ सरकारी शाळा असल्याने पालकांनी फिरवली पाठ 

गेल्या आठ दिवसात केवळ 33 हजार अर्ज भरले गेले आहेत.येत्या 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेशासाठी दिवस उरले आठ ; केवळ सरकारी शाळा असल्याने पालकांनी फिरवली पाठ 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (Right to Education Act-RTE)25 टक्के आरक्षित जागांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया (Online admission process)राबवली जात आहे.मात्र,यंदा प्रवेशासाठी केवळ सरकारी शाळा आणि खासगी मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळा (Government schools and private Marathi medium aided schools)उपलब्ध करून दिल्याने आरटीई प्रवेशाकडे पालकांनी पाठ फिरवल्याचे (Parents back to RTE admissions) चित्र दिसून येत आहे.कारण गेल्या आठ दिवसात केवळ 33 हजार पालकांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत.त्यामुळे सरकारी शाळांपेक्षा पालकांची स्वयंअर्थसहाय्यीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाच अधिक पसंती (Self-financing English medium schools are more preferred)असल्याचे स्पष्ट होत आहे. 

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे सुमारे आठ दिवसांपूर्वी आरटीई प्रवेश सुरू करण्यात आली.मात्र,गेल्या आठ दिवसात केवळ 33 हजार अर्ज भरले गेले आहेत. येत्या 30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.कदाचित ही मुदत वाढवली जाऊ शकते.मात्र, प्रवेशासाठी पालक फार उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.दरवर्षी आरटीई प्रवेशासाठी सुमारे एक लाख ते सव्वा लांखापर्यंत जागा उपलब्ध करून दिल्या जात होत्या.या सर्व जागा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील होत्या.पालकांना इंग्रजी शाळांबाबत आकर्षण असल्याने आपल्या मुलाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिक्षण घ्यावे,अशीच पालकांची मानसिकता झाली आहे.त्यामुळे पालक मोठ्या संख्येने अर्ज भरत होते.तसेच आरटीई प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार, यांची आतुरतेने वाट पाहत होते.

सरकारी शाळांमध्ये असणारा सुविधांचा आभाव,  शिक्षकांची अपुरी संख्या त्यामुळे ढासळलेली शैक्षणिक गुणवत्ता या कारणांमुळे पालक मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवण्यास तयार होत नाहीत.ही वस्तुस्थिती असली तरी काही सरकारी शाळांची गुणवत्ता चांगली असून तेथे सोई- सुविधा सुद्धा खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमप्रमाणेच आहेत.मात्र,अशा शाळांची संख्या बोटावर मोजण्या एवढी आहे.त्यामुळे पालक सरकारी शाळाऐवजी स्वयंअर्थसहाय्यीत इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती देतात.गेल्या काही वर्षाचा विचार करता आरटीई प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या तीन ते चार पट अर्ज येत होते.त्यामुळे ऑनलाईन लॉटरी काढावी लागत होती.यंदा 8 लाख 86 हजार जागांसाठी 1 लाख पालक आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी अर्ज करतील की नाही याबाबत शंका वाटते.त्यामुळे या वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रिया आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी नाही तर इंग्रजी शाळांचे हित समोर ठेऊन राबवली जात असल्याचा आरोप  पालकांकडून केला जात आहे. 
--------------------------------------------------

आरटीई प्रवेशाच्या जागा वाढल्यामुळे प्रवेशाच्या संधी वाढल्या आहेत, असा दावा शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केला जात होता.परंतु, पूर्वीच्या पद्धतीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल या उद्देशाने 80 ते 90 हजार विद्यार्थी आरटीई अंतर्गत शिक्षण प्रवाहात येत होते.परंतु, यंदा केलेला बदल हा गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहातून बाहेर फेकणारा आहे,असे प्रवेशासाठी अर्ज केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते.त्यामुळे हा बदल कोणाच्या हितासाठी केला गेला हे उघड होते.

- मुकुंद किर्दत, आप पालक युनियन 

----------------------------------------

आरटीई प्रवेशासाठी 2020-21 मध्ये 1 लाख 15 हजार 640 जागा उपलब्ध होत्या.त्यासाठी 2 लाख 91 हजार 663 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते.तर 2021-22 या शैक्षणिक वर्षात उपलब्ध असलेल्या 1 लाख 3 हजार 242 जागांसाठी 2 लाख 22 हजार 848 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते.2022-23 या वर्षासाठी 2 लाख 82 हजार 783 विद्यार्थ्यांनी 1 लाख 1 हजार 906 जागांसाठी अर्ज केले होते.मागील वर्षी म्हणजेच 2023-24 य शैक्षणिक वर्षात 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी तब्बल 3 लाख 64 हजार 413 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.या आकडेवारीचा विचार करता प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.मात्र,यंदा प्रवेश क्षमता वाढूनही आरटीई प्रवेशाला प्रतिसाद मिळत नसल्याचे प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

---------------------------------------------------------------------------

शैक्षणिक वर्ष    प्रवेश क्षमता   झालेले प्रवेश  रिक्त जागा 
2020-21  1,15,640    86,945  28,695 
2021-22  1,03,242  72,160    31,082 
2022-23   1,01,906 78,744  23,162 
2023-24    1,01,846   82,763  19,083